#Video : भाजप नेत्याची दादागिरी ; महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण ; व्हिडिओ व्हायरल

नरोडा : वृत्तसंस्था – गुजरातच्या नरोदामधील भाजपा आमदार बलराम थवानी यांनी राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. नीतू तेजवानी असं पीडित महिलेचं नाव असून, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागप्रमुख आहेत. त्या स्थानिक प्रश्न घेऊन आमदाराच्या कार्यालयामध्ये गेल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तेजवानी यांनी आमदार थवानी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल असून त्या सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नीतू तेजवानी काल रविवारी आमदार थवानींच्या कुबेरनगरमधील कार्यालयात गेल्या होत्या. विभागातील घरे आणि कार्यालयांतील कापलेल्या नळजोडण्या दोन दिवसांत पुन्हा दिल्या नाहीत तर, कार्यालयासमोर धरणे धरण्याचा इशारा त्यांनी थवानींना दिला. त्याचवेळी तिथे वाद झाला. आमदार थवानी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तेजवानी यांना कार्यालयाबाहेर काढत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

‘या घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देताना तेजवानी म्हणाल्या की, ‘थवानी यांनी स्थानिक समस्या ऐकून न घेताच मारहाण करण्यास सुरुवात केली. जेव्हा मी खाली पडले तेव्हा त्यांनी लाथांनी मारायला सुरुवात केली. यानंतर माझ्या नवऱ्यालाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली केली. आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली. मोदींनी त्यांच्याच राज्यात महिला सुरक्षित आहेत का याचे उत्तर द्यावे. ‘

ह्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच आमदार थवानी यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. भावनेच्या भरात मी वाहून गेलो. मी चूक मान्य करतो.कुणालाही मारहाण करण्याचा माझा हेतू नव्हता. जमावाकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. स्वसंरक्षणासाठी मारलेली लाथ चुकून महिलेला लागली. अशी सारवासारव आमदार थवानी यांनी केली आहे.२२ वर्षांपासून राजकारणात आहे पण असे कधी केले नाही. मी माफी मागण्यास तयार आहे. असेही ते म्हणाले.