हृतिक रोशनच्या ‘काबिल’ चित्रपटातील अभिनेत्री करतेय मराठीत ‘एन्ट्री’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  हृतिक रोशनच्या ‘काबिल’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री नीलम पांचाल आता लवकरच मराठीत पदार्पण करणार आहे. तिला नुकताच एक राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या ६६व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘हिलारो’ या गुजराती सिनेमातील आपल्या उत्तम अभिनयासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तिने अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ‘इश्कबाज’, ‘रुक जाना नही’, ‘वीरा’, ‘हमारी देवरानी’ अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिला तिच्या अभिनयाच्या जोरावर हृतिक रोशनच्या मुख्य भूमिकेत असणाऱ्या ‘काबील’ सिनेमामध्ये देखील पहिल्यांदाच काम करण्याची मोठी संधी मिळाली.

नीलम पांचाल सध्या हिंदी नाट्यसृष्टीत गाजत असणाऱ्या ‘भारत भाग्यविधाता ‘या हिंदी नाटकात ‘कस्तुरबा’ ही व्यक्तिरेखा उत्तमरित्या वठवत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर नीलम पांचाळने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती मराठीचे धडे गिरवताना दिसत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी ती मराठीत पदार्पण करणार याबद्दल कमालीची उत्सुकता दर्शवली आहे.

मराठीसृष्टीत पदार्पण करण्याचा खुलासा तिने स्वतः केला असून मुंबईत राहत असल्यामुळे मराठी सिनेमांविषयी प्रचंड ओढ असल्याचे तिने स्पष्ट केले तसेच मराठी बोलता जरी येत नसेल तरी चांगल्यापैकी मराठी समजते असेही तिने म्हटले. दरम्यान आता मराठीत पदार्पण करत असल्यामुळे मराठीचे धडे गिरवणे सध्या सुरू आहे.’ असे देखील तिने सांगितले.

नीलम मराठीत काम करणार असल्याचे निश्चित असले तरी ती नेमकी वेबसीरिजमध्ये काम करणार की मग नाटकमध्ये किंवा मालिका वा सिनेमा यापैकी कशात काम करणार याबद्दल अजून तरी स्पष्ट झाले नाही. तिला तिच्या भूमिकेबद्दल विचारले असता त्याबाबत बोलण्यास तिने नकार दिला. नीलम म्हणाली की, ‘सध्या मराठीतील एका नामवंत दिग्दर्शकाच्या प्रोजेक्टमध्ये काम सुरू असून जोपर्यंत निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा केली जात नाही तोपर्यंत याबाबत मी काहीच सांगू शकत नाही.’