Pune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोघांच्या भाडणातील दुसऱ्याची तक्रार आधी घेत असल्याच्या रागातून एका गुंठामंत्र्याने पोलीस चौकीतच पोलिसाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी राहुल लक्ष्मण भरम (वय-48 रा. केळेवाडी, पौड रोड, कोथरुड) याला अटक केली आहे. यापूर्वी मी तीन-चार पोलिसांना मारले, तुलाही सोडणार नाही अशी धमकी आरोपीने पोलीस कॉन्स्टेबल कौस्तुभ रवींद्र निढाळकर यांना दिली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कौस्तुभ निढाळकर यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार एरंडवणा पोलीस चौकीत 15 जानेवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल भरम आणि राहुल वाघ यांच्यामध्ये भांडण झाले होते. याची तक्रार देण्यासाठी दोघेही पोलीस चौकीत आले होते. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल कौस्तुभ निढाळकर यांनी दोघांना शांत राहून एका एकाने तक्रार द्या, असे समजावून सांगत होते. त्यांनी राहुल भरम याला बाजूला बसण्यास सांगितले.

त्यावेळी भरम याने त्याची तक्रार अगोदर का घेता असे म्हणत तुम्ही मला साईडला बसण्यास का सांगता, मी कोण आहे, तुम्हाला माहिती नाही. मी गुंठामंत्री आहे. तुमची नोकरी घालवीन असे बोलून शिवीगाळ करुन नाकाला धडक देऊन धक्काबुक्की केली. तसेच या अगोदर तीन चार पोलिसांना मारले आहे. तुला पण सोडणार नाही. तु मला उद्या भेट बघतो, असे बोलून त्यांना धमकी दिली. आरोपीवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास कोथरुड पोलीस करत आहेत.