कामाची गोष्ट ! नाही तर मिनीटाभरातच तुमचं बँक अकाऊंट होईल रिकामे, ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सायबर फसवणुकीचे प्रमाण गेल्या अनेक वर्षांपासून वाढतच आहे. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक केली जात असते, परंतु याबद्दल लोकांना काहीच कल्पना नसते. सायबर फसवणुकीत स्विम स्वॅपिंगद्वारे हॅकर्स लोकांच्या बँकेच्या खात्यातून पैसे काढतात. दिल्लीमधील एका उद्योगपतीच्या खात्यामधून सिम स्वॅपिंगच्या माध्यमाने तब्बल १८ लाख रुपये हॅकर्सने काढले. त्यामुळे सध्या सायबर फसवणुकीला अनेक लोकांना सामोरे जावे लागत आहे.

स्विम स्वॅप म्हणजे काय?
स्विम स्वॅप म्हणजे जो नंबर आहे त्याच नंबरचे दुसरे सिम घेणे किंवा सिम कार्ड बदलणे. यानुसार तुमच्या नंबरद्वारेच अजून एका सिमचे रजिस्ट्रेशन केले जात असते. असे केल्याने आपले मूळ सिम बंद पडते आणि त्या व्यक्तीकडे असणारे सिम चालू होते. यानुसार ओटीपी मागविला जातो आणि तुमच्या खात्यातून पैसे लंपास केले जातात. अशा प्रकरणांतून भारतात २०१८ मध्ये जवळपास २०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. अशा प्रकारांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती गोळा केली जाते. अनेक वेळा अनोळखी नंबरवरून तुम्हाला फोन येत असतात तेव्हा ते फोन तुमची माहिती गोळा करण्यासाठी केला गेलेला असतो. त्यामुळे याबाबत विशेष काळजी घ्यावी, अशा अनोळखी लोकांना माहिती देण्यापासून सावधानता बाळगावी.

सिम स्वपिंग कशी करतात?
जे हॅकर्स सिम स्वॅपिंगद्वारे फसवणुक करतात ते सिम कार्ड कंपनीतून बोलत असल्याचे सांगून फसवणूक करत असतात. तसेच ते कार्डच्या मागे असलेल्या २० अंकी नंबर विचारतात. हा नंबर सांगितल्यानंतर ते १ अंक दाबण्यास सांगतात, १ अंक दाबताच नवीन सिम कार्डचे ऑथेंटिकेशन येते आणि तुमचे नेटवर्क गायब होते आणि सिम कार्ड बंद पडते आणि गुन्हेगाराच्या मोबाईलमध्ये नेटवर्क येते. त्यानंतर गुन्हेगार बनावट साईट्सद्वारे तुमची संपुर्ण माहिती गोळा करतात. गुगलवर तुम्ही इंटरनेट बँकिंग सर्च केल्यानंतर कोणत्याही बनावट साईट्सवर तुमची माहिती दिली असेल तेथून तुमची माहिती काढली जाते. त्यामुळे त्यांच्याकडे इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड आणि आयडी आधीच असतात. या गुन्हेगारांना व्यवहार करण्यासाठी गरज असते ती फक्त ओटीपीची आणि सिम स्वपिंग करून ते साध्य करतात. त्यामुळे कोणताही बँकिंग व्यवहार करताना बँकेच्या अधिकृत वेबसाईट्सद्वारेच करणे फायद्याचे ठरते.

कोणती काळजी घ्यावी?
जर तुम्हाला सिम कार्ड दुसरे घ्यायचे असेल तर संबंधित सिमकार्ड कंपनीच्या दुकानात जाऊन त्याबाबतच्या प्रक्रियेची व्यवस्थित माहिती जाणून घेणे फायद्याचे ठरते. तसेच सिमकार्डचे नेटवर्क जर जात असेल तर दूसऱ्या मोबईलवरुन संबंधित कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करुन तशी माहिती द्या आणि पुढील प्रक्रिया काय असेल हे जाणून घ्या. समजा काळजी घेऊनही अशी घटना घडत असेल तर बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून सर्वात प्रथम डेबिट व क्रेडिट कार्ड बंद करण्यास सांगावे. तसेच बँकेकडे लेखी तक्रार देखील दाखल करावी. अशी काळजी घेतल्यास फसवणूक होणे थांबू शकेल.