भारताच्या ‘या’ धावपटूवर गावकऱ्यांचा बहिष्कार ; समलैंगिक असल्याची केली होती घोषणा

ओडिशा : वृत्तसंस्था – देशाची स्टार धावपटू द्युती चंद हिनं आपण समलैंगिक असल्याचं जाहीर केलं. कायद्याने समलैंगिकतेला मान्यता मिळाली. तरी समाजानं मात्र समलैंगिकांच्या भावना समजून घेणं स्विकारलेलं दिसत नाही. द्युती चंद हिला कुटुंबियांनी घराबाहेर काढण्याची धमकी दिली असताना आता गावानेही तिच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ओडिशाच्या दुर्गम भागातील गोपालपूर गावाचं नाव आज द्युती चंद हिच्या कर्तृत्वामुळे देशाच्या नकाशात प्रकाशझोतात आलं. याचा अभिमान वाटण्याऐवजी दुतीने समलैंगिक असल्याचं जाहीर केल्याने गावाची बदनामी झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

‘आमच्या गावच्या मुलीनं देशासाठी पदक जिंकलं याचा अभिमान आहे. पण तिच्या समलैंगिकतेच्या घोषणेने आम्हाला धक्का बसला’, असं गोपालपूर कोऑपरेटीव्ह सोसायटीचे अध्यक्ष बेनुधर म्हणाले.

द्युतीच्या कुटुंबियांनीही तिला घरातून हकालपट्टी करण्याची धमकी दिली आहे. ‘द्युती जे करतेय ते अनैतिक आहे. तिच्यामुळे आमची गावतील प्रतिष्ठा धुळीला मिळाली. माझ्या मुलीवर मला आता विश्वास राहिलेला नाही’, असं द्युतीचे वडील चक्रधर चंद म्हणाले.

द्युती ही आजच्या घडीला भारताची सर्वात वेगवान धावपटू आहे. आपण समलैंगिक आहोत असा खुलासा करणारी ती भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे. या खुलाशानंतर क्रीडा जगत आणि लैंगिक हक्कांशी संबंधित कार्यकर्त्यांनी द्युतीच्या या खुलाशाचे स्वागत केले. पण तिच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी तिला झिडकारलं हे दुर्दैवच म्हणावं लागेल.