फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला मुश्रीफांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे ग्रामविकास तथा कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांची लोकप्रियता एका महिलेशी केली होती. त्यानंतर आता हसन मुश्रीफ यांनी त्यावर वक्तव्य केले. ‘देवेंद्र फडणवीस यांनी माझी तुलना एका स्त्रीच्या लोकप्रियतेवर करणे योग्य नाही. त्यांनी डोनाल्ड ट्रम्पपेक्षा लोकप्रिय माणूस शोधून काढला पाहिजे होता’, असे मुश्रीफ म्हणाले.

कोल्हापूरहून गोव्याकडे हसन मुश्रीफ जात होते. त्यावेळी सावंतवाडी येथे ते थांबले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘रेमडेसिव्हिर या इंजेक्शनवरून भाजपची काही मंडळी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करत आहे. या इंजेक्शनचा साठा करून ठेवून तो भाजपच्या माध्यमातून वाटण्याचाच हा प्रयत्न होता. मात्र, महाविकास आघाडी सरकारने तो मोडीत काढला. त्यामुळेच कोणतेही प्रकरण उकरून काढून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचे असाच कट भाजपने चालवल्याचे दिसून येते. मी केंद्रीयमंत्री पियूष गोयल यांच्यावर जी टीका केली त्यावर आजही ठाम आहे. त्यांना गावात गेल्यावर पाच माणसे तरी ओळखतात का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी माझी तुलना एका स्त्रीच्या लोकप्रियतेवर करणे योग्य नाही’.

दरम्यान, कोरोनाची साखळी तुटली पाहिजे म्हणून सरकार खबरदारी घेत आहे. त्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. सरकारने कोरोना काळात मोठे पॅकेज दिले आहे. मात्र, जे घटक यातून राहिले आहेत, त्यांच्यासाठी ही सरकार काही तरी विचार करेल असे मुश्रीफ यांनी सांगितले.