उसने पैसे देण्यास नकार देणा-या दुकानदाराला हातोडीने मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

उसने पैसे देण्यास नकार देणा-या दुकानदाराला हातोडी, लाकडी दांडके आणि रॉडने मारहाण करुन जखमी केल्याची घटना पिंपरी मार्केटमध्ये घडली. पिंपरी मार्केटमधील ‘सुनिल होजिअरी’ या दुकानात सोमवारी (दि.१४) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश रामगोपाल यादव (वय:१९ रा. मिलिंदनगर, पिंपरी) याच्या सह पाच जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अनिल हसाकराम मोहनदासाणी (वय: ५९ रा. ओमसाई कॉम्प्लेक्स, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल यांचे पिंपरी मार्केटमध्ये सुनिल होजिअरी नावाचे दुकान आहे. आरोपी आणि अनिल हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सोमवारी रात्री आरोपी राजेश आणि त्याचे इतर साथीदार दुकानात आले. त्यांनी अनिल यांच्याकडे दोन हजार पाचशे रुपये उसने मागितले. अनिल यांनी पैसे उसने देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या राजेश आणि त्याच्या इतर साथीदारांनी दुकानात येऊन अनिल यांना हातोडी, रॉड, आणि लाकडी दांडक्याने मारहाण केल. तसेच आरोपी राजेश याच्या साथीदारांनी अनिल यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन दुकानातील सामानाची नासधूस केली. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.