त्यांनी आखला होता प्रसादात वीष मिसळण्याचा कट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंब्रा उपनगर आणि औरंगाबादेतून एटीएसने अटक केलेल्या त्या नऊ आयएस संशयितांनी मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथील प्रार्थना स्थळांच्या प्रसादात वीष कालविण्याचा कट रचला होता. त्यांच्याकडून वेगवेगळी विषारी द्रव्ये, स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तसेच ते आयएसआयस ‘ने प्रेरित झाले असून ‘टेलिग्राम सोशल अॅप’द्वारे परकीय हस्तकांशी संपर्कात असावेत, असा संशय एटीएसने न्यायालयात व्यक्त केला. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी १४ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.

एटीएसच्या पथकाने २२ जानेवारी रोजी मोहसीन सिराजुद्दीन खान (३२, रा. दमडी महल), मोहम्मद मशाहिद उल इस्लाम (२३, रा. कैसर कॉलनी), मोहम्मद सरफराज उर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (२३, रा. राहत कॉलनी), मोहम्मद तकी उर्फ अबू खालेद सिराजोद्दीन खान (२०, रा. कैसर कॉलनी), एक अल्पवयीन आरोपी, ठाण्यातील मुंब्रा येथील जमान नवाब खुटेउपाड (३२, रा. मुंब्रा), सलमान सिराजुद्दीन खान (२८, रा. मोतीबाग, मुंब्रा), फहाद महंमद इस्तियाक अन्सारी (अल्माश कॉलनी, मुंब्रा), मजहर अब्दुल रशिद शेख (२१, रा. मुंब्रा), तलहा उर्फ अबुबकर हनिफ पोतरिक (रा. मुंब्रा)  यांना अटक केली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले होते.

संशयितांकडून संगणकांच्या हार्डडिस्क, विषारी द्रव्य असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ते सर्वजण आयएस या दहशतवादी संघटनेची विचारधारा, प्रशिक्षण, लेख, पुस्तके, व्हिडिओ-ऑडिओने प्रेरित झालेले आहेत आणि त्यातूनच मुंबई, पुणे व औरंगाबादमध्ये प्रार्थनास्थळांसमोर वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादामध्ये विष कालवण्याचा कट त्यांनी रचला होता. यातील संशयित जमाल हा फार्मसीचा पदवीधर असून, विषारी द्रव्य व स्फोटके तयार केली होती, अशी माहिती एटीएसकडून कोर्टात देण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात महत्वपुर्ण माहिती मिळाली आहे. ते विदेशात कोणाच्या संपर्कात होते का व ते कोणाशी चॅटींग करत होते का यासह जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक डेटाचीही तपासणी करावयाची आहे.यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.