हार्दिक पांडयाची रेकॉर्डब्रेक कामगिरी ! 20 षटकार ठोकत केवळ 26 चेंडूत केल्या 144 धावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय संघाचा हुकुमी एक्का अर्थात हार्दिक पांड्या. अनेक दिवसांपासून दुखापतीमुळे खेळापासून दूर असलेला हा क्रिकेटपटू अखेर कमबॅक करणार आहे. भारतीय संघात खेळण्याआधी हार्दिक पांड्या सध्या डीव्हाय पाटील टी-20 लीग खेळत आहे. या स्पर्धेत तीन सामन्यात पांड्याने सलग दोन शतक लगावले असून 26 चेंडूत त्याने 144 धावा केल्या आहेत. ज्यात 20 षटकारदेखील मारले आहेत.

38 षटकारांसह 347 धावा :
डीव्हाय पाटील टी -20 स्पर्धेत हार्दिकने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. ज्यातील पहिल्या सामन्यात 4 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. तर दुसर्‍या सामन्यात 10 षटकारांच्या मदतीने 105 धावा केल्या. महत्वाचे म्हणजे या सामन्यात त्याने 37 चेंडूत शतक पूर्ण केले. तिसर्‍या सामन्यात पांड्याने पुन्हा 4 षटकारांसह 46 धावा केल्या. तर चौथ्या सामन्यात त्याने 20 षटकारांच्या मदतीने 158 धावा केल्या. पांड्याने चार सामन्यात 38 षटकारांच्या मदतीने 347 धावा केल्या.

एवढेच नव्हे तर हार्दिक पांड्याने डीव्हाय पाटील टी -20 स्पर्धेत केवळ फलंदाजीच नव्हे तर गोलंदाजीने देखील तुफान कामगिरी केली. पहिल्या सामन्यात पांड्याने 26 धावांत 5 बळी घेतले तर दुसर्‍या सामन्यातहिच त्याने 5 बळी घेतले.

भारतीय संघात मिळणार जागा?
दरम्यान, हार्दिक पांड्याचा दमदार कमबॅक पाहता, त्याला पुढे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकते. या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यात हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त असल्याने त्याला संघाबाहेर ठेवण्याची शक्यता कमी आहे. माहितीनुसार या मालिकेत विराट कोहलीला दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते.