पुण्याच्या तब्बल १६४ नगरसेवकांसाठी हेलिकॉप्टर खरेदी करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गुरुवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान हेलिकॉप्टरचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. शहरातील तब्बल १६४ नगरसेवकांकरिता महापालिका महागडी हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी महापालिकाच ती भाडेतत्वावर देणार अशी  शक्कल पदाधिकारी आणि नगरसेवकांनी लढवली आहे.त्याचवेळी वाहनमालकांकडून नगरसेवक स्वतः पार्कींगचे पैसे गोळा करतील. गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही तर त्यासाठी शहरालगतच्या टेकड्यांवर घरे देखील बांधली जातील. असे अनेक प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर झाले. पण ही सभा  उल्टा-पुल्टा असल्याने या प्रस्तावावर कार्यवाही होणार नाही

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त ही विशेष सभा घेण्यात आली. या सभेत पदाधिकारी-नगरसेवक अधिकाऱ्यांच्या तर अधिकारी हे पदाधिकारी-नगरसेवकांच्या भूमिकेत होते. या सभेत महापौर मुक्ता टिळक यांनी आयुक्त म्हणून कामकाज केले तर आयुक्त सौरभ राव हे महापौरांच्या आसनात होते. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले. सुनील पारखी यांनी सभागृहनेत्यांची भूमिका करून, सभागृहात धमाल उडविली, तर अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल आणि डॉ. विपीन शर्मा यांनीही गटनेत्यांच्या भूमिकेतून प्रशासनावर जोरदार हल्ले चढविले. खातेप्रमुखांनीही गमतीशीर प्रस्ताव मांडले.

दरम्यान, उल्टा-पुल्टा सभेतही जलपर्णीच्या निविदेचा विषय रंगला. जलपर्णी काढायची नाही, अशी मागणी सभागृहात करण्यात आली. महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, विलास कानडे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनीही प्रस्ताव मांडून ते मंजूर करून घेतले.