लष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या हिदायतुल्ला मलिकला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लष्कर -ए- मुस्तफा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हिदायतुल्ला मलिक याला आज (शनिवार) अटक करण्यात आली आहे. जम्मू व अनंतनाग पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत त्याला जम्मू येथून अटक केली गेली. यावेळी त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. लष्कर -ए-मुस्तफा ही दहशतवादी संघटना काश्मीर घाटीमधील पाकिस्तानी दहशतवादी समूह जैश-ए-मोहम्मदची प्रमुख संघटना आहे.

हिदायतुल्ला मलिकच्या अटकेमुळे दहशतवादी कारवायांशी निगडीत महत्वपूर्ण माहिती, भारतीय लष्कराच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याची त्याची योजना होती. जम्मूच्या पोलिस महासंचालकांनी ट्विटद्वारे मलिकला अटक केल्याची माहिती दिली आहे.

जम्मूचे एसएसपी श्रीधर पाटील यांनी सांगितले की, जम्मूच्या कुंजवानीजवळ दहशतवादी मलिकला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक ग्रेनेड हस्तगत करण्यात आले आहे. जेव्हा पोलिस त्याला अटक करण्यासाठी पोहचले तेव्हा त्याने पोलिसांवर हल्ला केल्याचे पाटील यांनी सांगितले.