100 कोटी हप्ता वसुलीच्या टार्गेटचा आरोप : उच्चस्तरीय चौकशी समितीमध्ये ‘हे’ निवृत्त न्यायमूर्ती करणार चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असा सनसनाटी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आता या आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने 1 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची या समितीवर नियुक्ती केली असून समितीने आपला अहवाल 6 महिन्यांत शासनाला सादर करावा, असे आदेश शासनाला दिले आहेत. दरम्यान विरोधीपक्षांसह ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, ते खुद्द गृहमंत्री देशमुख यांना देखील निष्पक्ष चौकशी व्हावी असे वाटत होते. देशमुखांनी तसे पत्रच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. त्यानुसार आता ही चौकशी सुरू होणार असून या चौकशीतून कोणते सत्य बाहेर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

परमबीर सिंह यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवले होते. पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे गृहमंत्री देशमुखांनी किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याचे निष्पन्न होईल असा काही पुरावा सिंह यांनी त्या पत्रात सादर केला आहे का याबाबतही समिती चौकशी करणार आहे. तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील आणि सचिन वाझे यांच्याकडून प्राप्त झालेल्या तथाकथित माहितीच्या आधारे परमबीर सिंह यांची बदली झाल्यानंतर गृहमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एखादा गुन्हा केल्याचे निष्पन्न होते का याची देखील चौकशी होईल. तसे असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत किंवा इतर तपास यंत्रणांमार्फत तपासणीची गरज आहे का याबाबत ही समिती निर्णय घेणार आहे.