‘कोरोना’मुळे हिंगणघाट जळीतकांडाची सुनावणी ठप्प !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे हिंगणघाट च्या जळीतकांडाच्या सुनावणीबाबत सध्या कुठलीच हालचाल होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने सुरक्षेच्या कारणास्तव हे प्रकरण हिंगणघाट ऐवजी वर्धा न्यायालयात चालवण्याची विनंती केली होती. त्या अर्जावर अद्याप काहीही निर्णय नसल्याची माहिती जिल्हा शासकीय अधिवक्ता गिरीष तकवाले यांनी दिली. हिंगणघाटच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत अंकिता यांना हिंगणघाटच्या नंदोरी चौकात पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला.

त्यामुळे राज्यशासनाने तत्काळ दखल घेत तरुणीच्या उपचारासाठी सर्व तो खर्च देण्याची तयारी दर्शविली होती. त्याशिवाय मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांना नागपूरला पाठवले होते. मात्र उपचाराच्या आठ दिवसानंतर 10 फेब्रुवारीला अंकिताचे निधन झाले. याप्रकरणी आरोपी विक्की नगराळेला अटक करण्यात आली होती. विक्कीने एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, म्हणून वकील उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात नियुक्ती करण्याची मागणी शासनानेही तत्परतेने मान्य केली होती. त्यांनीच वर्धा न्यायालयात कामकाज चालावे म्हणून अर्ज दिला. मात्र मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट आल्याने न्यायालयाच्या कामकाजावरही परिणाम झाल्यामुळे कामकाज थांबल्याची माहिती आहे.