डेथ इन कस्टडी : 5 पोलिसांच्या निलंबनानंतर तपास सीआयडीकडे

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शुक्रवारी छापा टाकल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. ते ग्रामसेवक होते. त्यानंतर 5 पोलिसांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आणि आता मृत्यू पक्ररणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला आहे. त्याबाबतचा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने काढला आहे. सीआयडीच्या पथकाने मृत्यू प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे रविवारी ताब्यात घेतली आहेत.
शुक्रवारी (दि.23) एलसीबीच्या पथकाने जुगार अड्डयावर छापा टाकला होता. एलसीबीच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले होते. त्यामध्ये ग्रामसेवक गोपाळराव बेंगाळ यांचा समावेश होता. बेंगाळ यांनी पोलिसांना विनवणी करून आपण जुगार खेळण्यासाठी आलो नसुन फिरण्यासाठी आलो आहोत असे सांगितले. तरीदेखील पोलिसांनी त्यांना पोलिस वाहनात बसविले आणि सेनगाव येथे आणले होते. त्यावेळी त्यांचा र्‍हदयविकाराने मृत्यू झाला. बेंगाळ यांच्या मृत्युनंतर गावात प्रचंड खळबळ उडाली. तब्बल 25 तासानंतर बेंगाळ यांचा मृतदेह गावकर्‍यांनी ताब्यात घेतला. त्यावेळी संबंधित पोलिसांना निलंबीत करण्याचे आश्‍वासन वरिष्ठांनी बेंगाळ यांच्या नातेवाईकांना दिले होते. शनिवारी रात्री उशिरा पोलिस कर्मचारी हेमंत दराडे, शंकर जाधव, नाना पोले, विठ्ठल कोळेकर आणि अमित मोडक यांना निलंबीत करण्यात आले.
पोलीस वाहनात म्हणजेच पोलिसांच्या ताब्यात असताना बेंगाळ यांचा मृत्यू झाल्याने प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक एस.आर. जगताप यांच्या पथकाने मृत्यु प्रकरणाची सर्व कागदपत्रे रविवारी ताब्यात घेतली. सीआयडी आता बेंगाळ यांच्याबरोबर ताब्यात घेण्यात आलेल्या इतर तिघांचे तसेच इतरांचे देखील जबाब नोंदविणार आहे. बेंगाळ यांच्या मृत्यूमुळे 5 हुन अधिक पोलिस आणि काही अधिकारी अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

ही तर डेथ इन कस्टडी
बेंगाळ यांच्या मृत्यु प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याचा आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाने दिल्यानंतर हे प्रकरण डेथ इन कस्टडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेंगाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांना आपण फिरण्यासाठी आलो आहोत असे सांगितले होते. मात्र, त्या 5 पोलिस कर्मचार्‍यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवला नाही. बेंगाळ यांचे मृत्यू प्रकरण निलंबीत झालेल्या त्या 5 पोलिस कर्मचार्‍यांना चांगलेच अंगलट आले आहे.