अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार किम कार्दशियनचा पती ‘रॅपर’ कान्ये वेस्ट, ट्विट करत केली घोषणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. अशात आता राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे. कारण कोरोना व्हायरस आणि आपल्या धोरणांमुळं डोनाल्ड ट्रम्प देशातील जनतेच्या निशाण्यावर आहेत. अशातच आता अमेरिकन टीव्ही स्टार किम कार्दशियन हिचा पती अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट यावर्षी अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार आहे. कान्येनं शनिवारी (दि 4 जुलै) यासंदर्भात घोषणा केली आहे.

ट्विट करत कान्येनं यासंदर्भात माहिती दिली आहे. जर कान्येनं ही निवडणूक लढवली तर त्याचा सामना अमेरिकेचे वर्तमानातील राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत होणार आहे. कान्येच्या या घोषणेनंतर अमेरिकेतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

कान्ये वेस्टनं ट्विट करत लिहिलं की, “आता आपण देवावर विश्वा ठेवायला हवा आणि अमेरिकेच्या आश्वासनांना प्रत्यक्षात आणावं लागेल. आपल्याला आता नव्या भविष्याची निर्मिती करावी लागेल. मी अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणार आहे.”

https://twitter.com/kanyewest/status/1279575273365594112?s=20

या ट्विटनंतर कान्येची पत्नी किम कार्दशियन हिनं अमेरिकेच्या ध्वजासोबत पतीचं समर्थन केलं आहे. या ट्विटनंतर किम आणि कान्ये वेस्ट यांची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

कान्येच्या या ट्विटनंतर काहींनी तर आताच किम कार्दशियन हिला अमेरिकेची फर्स्ट लेडी म्हणून संबोधायला सुरुवात केली आहे. एलन मस्कनं देखील प्रतिक्रिया देत लिहिलं की, कान्ये मी तुमचं पूर्णपणे समर्थन करतो आहे.

अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. कान्येनं अद्याप काही अधिकृत अर्ज दाखल केलाय किंवा नाही ही माहिती समोर आलेली नाही. याआधी 2015 साली कान्येनं अमेरिकेचा राष्ट्रपती बनण्याची इच्छा व्यक्त केली होती.