शिवसेना मंत्र्याच्या पत्राला HM अमित शहांनी दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या अखत्यारितील प्राधिकरणांत त्रि-भाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा वापर करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे अमित शहा यांनी पत्राद्वारे कळविले आहे. शिवसेना मंत्री सुभाष देसाई यांनी अमित शहा यांना याबाबत पत्र लिहले होते. या पत्राला अमित शहा यांनी उत्तर दिले आहे.

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार मराठी ही राज्याची अधिकृत भाषा आहे. केंद्र शासनाने नियम 1967 चे धोरण अंगिकारलेले असून त्याद्वारे राज्याच्या अखत्यारितील केंद्र शासनाच्या सर्व कार्यालयांना त्रि-भाषा सूत्र लागू केले आहे. मात्र, राष्ट्रीयकृत बँका, पश्चिम आणि मध्य रेल्वे, टपाल आदी कार्यालयात या सूत्राची अंमलबजावणी होत नसल्याची बाब देसाई यांनी निदर्शनास आणून दिली होती. याबाबत सुभाष देसाई यांनी 6 फेब्रुवारी रोजी अमित शहा यांना पत्र पाठवून सूत्राची अंमलबजावणी करण्याबाबत विनंती केली होती.

सुभाष देसाई यांनी लिहलेल्या पत्राला अमित शहा यांनी 20 फेब्रुवारी रोजी उत्तर कळवले आहे. केंद्राच्या अखत्यारितील प्राधिकरणांत त्री-भाषा सूत्राची अंमलबजावणी होते किंवा नाही, याची संबंधितांकडून माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल असे शहा यांनी कळवले आहे. त्यामुळे केंद्राच्या अखत्यारितील प्रधिकरणांमध्ये मराठी भाषेचा वापर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.