वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंच्या Whats App स्टेट्सबाबत गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ कार आढळून आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. ही कार मनसुख हिरेन या व्यक्तीच्या नावावर होती. पण काही दिवसांनी मनसुख हिरेन यांचा मृतदेह आदळून आला होता. त्यानंतर हे प्रकरण अधिवेशनात मोठ्या प्रमाणात गाजले.

या सर्व प्रकरणात तपास अधिकारी सचिन वाझे यांचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. या प्रकरणाचा तपास सचिन वाझे हेच करत होते. अधिवेशनात विरोधकांच्या दबावामुळे सरकारला सचिन वाझे यांची बदली करावी लागली. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा अजून तपास सुरू आहे. याच दरम्यान सचिन वाझे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्या स्टेटसच्या शेवटी आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे, आता सहन करण्याची क्षमता नसल्याचं लिहिले आहे.

याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारले असता, ‘मी आत्ताच मुंबईहून नागपुरामध्ये पोहोचलो, संपूर्ण माहिती घेतोय, एवढेच उत्तर त्यांनी दिले. या विषयावर त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. सचिन वाझे यांचा मुद्दा अधिवेशनात उचलून धरल्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच आता न्यायालयानेसुद्धा वाझेंचा अंतरिम जामीन फेटाळला आहे.

काय आहे सचिन वाझे यांचे धक्कादायक स्टेटस

मला माझ्याच CID मधील सहकाऱ्यांकडून ३ मार्च २००४ मध्ये खोट्या केसमध्ये अटक करण्यात आली होती. त्या अटकेमधून अजूनही कोणता निष्कर्ष निघालेला नाही. मला असं वाटत आहे, पुन्हा तसंच काहीतरी होणार आहे. माझेच सहकारी मला खोट्या सापळ्यात अडकवत आहेत. मात्र, यावेळी परिस्थितीत किंचित बदल झाला आहे. त्यावेळी माझ्याकडे आशा, संयम आणि सेवेची १७ वर्षे होती. पण आता मात्र माझ्याकडे ना सेवेची १७ वर्षे असतील आणि ना जगण्याचा संयम आहे. मला असं वाटतं की, आता या जवळ येणाऱ्या जगाला गुड बाय करण्याची वेळ आली आहे.