SSR Death Case : गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ‘सर्वोच्च’ निकालानंतर भाजप नेत्यांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. यासंदर्भात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकवर आज सर्वोच्च सुनावणी झाली. न्यायालयाने सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, असे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचना देखील सर्वोच्च न्यायालयाने केल्या आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरिट सोमैय्या आणि भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. तसेच, भाजपाच्या अनेक नेत्यांनीही ही मागणी लावून धरली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनीही सीबीआय चौकशी मागणी करणारे पत्र गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले होते. मात्र अनिल देशमुख यांनी पार्थ पवार यांची मागणी फेटाळून लावली. यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा असे आदेश दिले. यावरून भाजप नेत्यांनी गृहमंत्र्यांना टार्गेट केले आहे.

माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मेन्शन करत सोमैय्या यांनी ही मागणी केली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलीस कमिशनर यांनी 2 महिने एफआयआर न घेणे दुर्दैवी आहे. सुशांत सिंहच्या परिवाराला न्याय मिळेल असे सोमैय्या यांनी म्हटले आहे.

तर भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्य म्हटले आहे की, सुशांत सिंह केस सीबीआयकडे सोपवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे धन्यवाद. आता कडक ताशेऱ्यानंतर तरी गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. मुंबईच्या पोलीस आयुक्तांची हाकालपट्टी करुन त्यांच्यासह संबंधित पोलिसांची सीबीआय चौकशी करावी. त्यांच्यावर कोणाचा दबाव होता याची ही चौकशी व्हावी, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.