कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पुण्यातील हॉटेल डेक्कन गॅलेक्सीवर कारवाई, हुक्का पॉट जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. राज्यात पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, कोरोना नियमांचे उल्लंघन करुन हॉटेल सुरु ठेवत हुक्का विक्री करणाऱ्या डेक्कन गॅलेक्सी हॉटेलवर डेक्कन पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी या ठिकाणावरुन दोन हुक्का पॉट जप्त केले आहेत.

डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले की, डेक्कन गॅलक्सी हॉटेल सुरु असून ग्राहकांना हुक्का व जेवण पुरवले जात असल्याची माहिती समजली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा लंबे यांनी त्यांच्या पथकाने डेक्कन गॅलेक्सी हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी हॉटेल मॅनेजर व कामगार हे जेवण पुरवत असल्याचे आढळून आले. याशिवाय हॉटेलमधून ग्राहकांना हुक्का विक्री करत असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टकाला असता दोन हुक्का पॉट जप्त करण्यात आले. तसेच हुक्क्याचे चार नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात हॉटेलमध्ये ग्राहकांना जेवण देण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही हॉटेल डेक्कन गॅलेक्सीमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. त्यानुसार हॉटले मालकासह कामगारांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.