AADHAAR : आता वास्तव्याच्या पुराव्याशिवायही आधारवरील पत्ता बदलू शकता

मुंबई : वृत्तसंस्था – आधार कार्ड सर्वांसाठीच गरजेचे आहे. नवीन वर्षाची सुरुवात नव्याने बदललेल्या नियमांनी झाली आहे. तुम्हाला काही नियम माहित असतीलही आणि नसतीलही. म्हणून आपण आधार कार्डसाठी आता नवीन नियम आला आहे तो जाणून घेणार आहोत. काही जण सतत नोकरीनिमित्त घरे बदलत असतात. अशा घरे किंवा शहरे बदलणाऱ्या लोकांसाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे. मुख्य म्हणजे त्यांना आता निवासी पुरावा नसला तरीही आधारवरील पत्ता बदलता येऊ शकणार आहे.
सध्या युआयडीएआयने प्राथमिक स्वरुपात या सेवेची सुरुवात केली आहे. यासोबतच जर जन्म दिनांकामध्ये बदल करायचा असेल तर 1 जानेवारीपासून जवळच्या आधार केंद्रावर जाऊन बदलू शकता. मात्र, दुसऱ्यांदा जन्म दिनांकामध्ये बदल करायचा असल्यास आधारच्या क्षेत्रिय कार्यालयाकडे जावे लागणार आहे.
पत्ता कसा अपडेट कराल..?
1) पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला युनिक आयडेंटीफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या uidai.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल.
2) येथे गेल्यानंतर आधार अपडेट सेक्शनमध्ये Address Update Request (Online) वर क्लिक करावे लागेल.
3) आता नवीन पेज ओपन होईल. यामध्ये  Update Address आणि Request for Address Validation Letter नावाचा पर्याय दिसेल. यापैकी Address Validation Letter वर क्लिक करावे.
4) यानंतर पुढील पेजवर आधार क्रमांक टाकावा. खाली कॅप्चा कोड असेल. तो टाकल्यानंतर सेंड ओटीपी किंवा एन्टर ओटीपी वटनावर क्लिक करावे. हा पासवर्ड तुमच्या आधारकडे नोंद असलेल्या मोबाईलवर येईल.
5) हा ओटीपी वेबसाईटवर टाकल्यानंतर लॉगईनवर क्लिक करा.
6) यानंतर तुम्हाला ओळखणाऱ्याचा (व्हेरिफायर) आधार नंबर टाकून सबमिट बटन दाबावे. (टीप : तुम्हाला जो पत्ता बदलायचा आहे तो ओळखणाऱ्या व्यक्तीच्या आधारवरील पत्ता असावा.)
7) हा टप्पा पार केल्यानंतर तुम्हाला सर्विस रिक्वेस्ट नंबर दिला जातो. हा नंबर नोंद करून ठेवावा.
8) या सोबतच व्हेरिफायरच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी आणि लिंक पाठविण्यात येईल.
9) या लिंकवर व्हेरिफायरने जाऊन ओटीपी टाकत तुम्हाला परवानगी द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला या संबंधीचा मेसेज मिळेल.
10) हा मेसेज आल्यानंतर तुम्हाला तीन टप्प्यांमध्ये पत्ता टाकून Update Address बटनावर क्लिक करावे लागेल. यासाठी सर्विस रिक्वेस्ट नंबर किंवा आधार नंबर आणि नव्याने आलेला ओटीपी टाकून लॉगईन करावे लागणार आहे.
11) लॉगइन केल्यानंतर तुम्ही नवीन पत्त्याचा प्रिव्ह्यू पाहू शकता. गरज पडल्यास स्थानिक भाषेमध्ये बदलही करू शकता. यानंतर अॅड्रेस व्हॅलिडेशन रिक्वेस्टला सबमिट करावे लागेल.
12) ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर पोस्टाद्वारे नव्या पत्त्यावर व्हेरिफिकेशन लेटर पाठविण्यात येईल.या पत्रामध्ये एक सिक्रेट कोड असेल.
13) यानंतर पुन्हा तुम्हाला तीन टप्प्यातील Update Address बटनावर जाऊन लॉगईन करावे लागेल. यामध्ये तुम्हाला Have address validation letter असे दिसेल. त्याच्या समोरील चेक बॉक्सवर टीक करून सबमिट बटन दाबावे लागेल.
14) यानंतर तुम्हाला प्राप्त झालेला सिक्रेट कोड टाकावा लागेल. यानंतर व्हेरिफाय बटनावर क्लिक करून Proceed to Update Address बटनावर क्लिक करावे लागेल.
15) व्हेरिफाय झाल्यानंतर तुमच्या आधारवरील नवीन पत्ता अपडेट केला जाईल. याची सूचना आधार धारकाला मिळेल.