म्युकरमायकोसिस कसा करतो शरीरावर हल्ला? तज्ज्ञांकडून जाणून घ्या संसर्गाची कारणे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान सुरु आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण आता कोरोनाबाधितांना ब्लॅक फंगस या नव्या आजाराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

कोरोना व्हायरससह म्युकरमायकोसिसचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, ‘म्युकरमायकोसिस हा चेहरा, संक्रमित नाक, डोळे आणि मेंदूला बाधित करू शकतो. त्यामुळे दृष्टी जाण्याचीही भीती असते. त्याबरोबरच म्युकरमायकोसिसचा संसर्ग हा फुप्फुसांपर्यंतही पोहोचू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली’.

म्युकरमायकोसिस बीजाणू माती, हवा आणि भोजनामध्येही दिसून येतात. मात्र, ते कमी विषाणूजन्य असतात आणि संसर्गाचे कारण ठरत नाहीत. कोरोनाच्या संसर्गास सुरुवात होण्यापूर्वी अशाप्रकारच्या संसर्गाचे कमी रुग्ण सापडत असत. मात्र, आता कोरोनामुळे म्युकरमायकोसिसचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याचे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.

रुग्णांवर उपचार सुरु

सध्या एम्समध्ये अशाप्रकारच्या बुरशीजन्य संसर्गाच्या 23 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 20 जण अद्यापही कोरोनाबाधित आहेत. तर 3 रुग्ण कोरोना निगेटिव्ह आहेत. अनेक राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे 500 पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत.

…म्हणून धोका अधिक

स्टेरॉईडचा चुकीचा वापर हे या संसर्गाचे प्रमुख कारण आहे. डायबिटिस, कोरोना पॉझिटिव्ह आणि स्टेरॉईड घेणाऱ्या रुग्णांमध्ये या बुरशीजन्य संसर्गाची शक्यता अधिक असते. त्याला रोखण्यासाठी आपण स्टेरॉईडचा दुरुपयोग थांबवला पाहिजे.