वयाच्या 65 व्या वर्षी लग्न करणारे प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांच्याकडे किती मालमत्ता ?, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : वयाच्या 65 व्या वर्षी आपल्या 56 वर्षीय महिला मैत्रिणीबरोबर दुसरे लग्न केल्यानंतर भारताचे माजी भारतीय सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध वकील हरीश साळवे सध्या चर्चेत आहेत. त्यांनी पहिली पत्नी मीनाक्षी साळवेला घटस्फोट देऊन ब्रिटिश कलाकार कॅरोलिनशी लंडनमधील एका चर्चमध्ये ख्रिश्चन धर्माच्या रूढीनुसार लग्न केले. वयाच्या या टप्प्यात दुसरे लग्न करणारे हरीश साळवे आपल्या लाईफ स्टाईलबाबत देखील चर्चेत असतात. त्यांना पियानो व गॅझेट्सची आवड आहे, असेही म्हटले जाते की साळवे त्यांच्या क्लायंटकडून दिवसाला 30 लाख रुपयांपर्यंत शुल्क घेतात.

सलमान, मुकेश अंबानी, रतन टाटा यांच्यासाठी लढवली आहे केस

सर्वोच्च न्यायालयात सॉलिसिटर राहिलेले ज्येष्ठ वकील साळवे यांनी सलमान खान, मुकेश अंबानी, रतन टाटा, व्होडाफोन आणि रिलायन्स यासारख्या मोठ्या कंपन्या व लोकांसाठी न्यायालयात बाजू मांडली आहे. साळवे हे भारतीयांचे सर्वात आवडते वकील तेव्हा बनले होते जेव्हा त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांचा खटला लढताना पाकिस्तानला धूळ चाटवली होती, आणि विशेष म्हणजे देशातील एक महागडे वकील असूनही कुलभूषण जाधव प्रकरणात त्यांनी केवळ 1 रुपयांची फी आकारली होती.

साळवे महागड्या जीवनशैलीसाठी ओळखले जातात

हरीश साळवे आपल्या महागड्या जीवनशैलीमुळे देखील चर्चेत असतात. मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे 100 कोटींची किंमत असलेल्या 800 यार्ड कोठीचे ते मालक आहेत. त्यांची ही कोठी दिल्लीतील कुलीन पालम मार्गावर आहे. याव्यतिरिक्त साळवे यांना पियानो वाजविणे, बेंटले कार चालविणे आणि पुस्तके वाचण्याचा छंद आहे. 65 वर्षीय साळवे यांना नवीनतम गॅझेट आवडतात. ते सतत आपला मोबाइल फोन बदलत असतात.

दिवसाला 30 लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारतात

याशिवाय मीडियात अशा बातम्या येत असतात की ते एका पेशीसाठी कमीत कमी साडेचार लाख रुपयांपर्यंत शुल्क घेतात, असेही म्हटले जाते की ते एका दिवसाची 30 लाख रुपये फी घेतात. हरीश साळवे हे दीर्घ काळापासून देशातील सर्वात मोठ्या आयकर भरणा करणाऱ्यांपैकी एक आहेत. न्यायालयीन अनुभवामुळे हरीश साळवे हे भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार भारताच्या 50 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये ते 43 व्या स्थानी आहेत.

हरीश साळवे यांची एकूण मालमत्ता

हरीश साळवे यांच्या एकूण मालमत्तेविषयी बर्‍याच माध्यमांच्या अहवालांमध्ये भिन्न-भिन्न माहिती आहे. परंतु टॅक्स ट्रिब्यूनलच्या समक्ष आयकर विभागाविरूद्ध लढलेल्या एका प्रकरणात त्यांच्याकडून देण्यात आलेल्या उत्पन्नाच्या आकडेवारीबद्दल बघितले तर ते एका सामान्य माणसाच्या विचारांपेक्षा अधिक पटीने जास्त आहे. 2010-11 मध्ये हरीश साळवे यांचे उत्पन्न 35 कोटी रुपये होते, या अंदाजानुसार त्यांचे सध्याचे वार्षिक उत्पन्न 60 ते 70 कोटींच्या दरम्यान असेल. मीडिया रिपोर्टनुसार साळवे यांची एकूण मालमत्ता सुमारे 200 कोटी रुपये असेल.