‘भजन’, ‘अध्यात्मा’साठी किती वेळ तुमच्याकडं ? अर्धे आयुष्य झोपेत तर उरलेले ‘बालपण’ व ‘आजारपण’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

गातों वासुदेव मीं ऐका । चित्त ठेवुनि ठायीं भावें एका । डोळे झाकुनि रात्र करूं नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥१॥
राम राम स्मरा आधीं । लाहो करा गांठ घाला मूळबंदीं । सांडावा उगिया उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदीं गा ॥ध्रु.॥
ऐसा अल्प मानवी देह । शत गणिलें अर्ध रात्र खाय । पुढें बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासि उरलें तें पाहें गा ॥२॥
क्षणभंगुर नाहीं भरवसा । व्हा रे सावध सोडा माया आशा । न चळे बळ पडेल मग फासा । पुढें हुशार थोर आहे वोळसा गा ॥३॥
कांहीं थोडें बहुत लागपाठ । करा भक्ति भाव धरा बळकट । तन मन ध्यान लावुनियां नीट । जर असेल करणें गोड शेवट गा ॥४॥
विनवितों सकळां जनां । कर जोडुनि थोरां लाहनां । दान इतुलें द्या मज दीना । म्हणे तुकयाबंधु राम म्हणा गा ॥५॥

अभंगाचा सरळ अर्थ –
मी वासुदेवाचे भजन गात आहे, ते ऐका. एकभावाने, एकचित्ताने ऐका. आयुष्य फुकट घालू नका. काळ त्याची गणती करीत बसला आहे. आधी राम राम म्हणा. मुळ स्वरूपाशी एकरुप व्हा. बाकीच्या गोष्टी टाकून द्या. भगवंताच्या ठिकाणी मन एकरूप करा. मानवी देह आल्पायुष्य आहे. मानवी आयुष्य शंभर वर्ष असे धरले आहे. त्यातील पन्नास वर्ष झोपेने खाल्ली, बाकीच्या आयुष्यात बालपण आहे. रोग यामुळे क्षय झाला. म्हणजे भजनासाठी किती आयुष्य शिल्लक राहिले ते पाहा. आहे ते आयुष्य क्षभांगुर आहे. यासाठी तुम्ही सावध होऊन आशा, मोह, माया यांचे पाश तोडून टाका. यमाच्या जाळ्यात अडकल्यावर तुमचे काही चालणार नाही. पुढे मोठा फेरा आहे, म्हणून तुम्ही आताच सावध व्हा. भक्तीभाव दृढ करा. शेवट गोड करायचा असेल तर तन मन भगवंताला अर्पण करा व त्याचे भजन करा. तुकाराम महाराज म्हणतात, मी हात जोडून सर्व लाहान- थोरांना विनंती करतो, कि तुम्ही राम राम म्हणा. एवढं दान मला या गरिबाला द्या.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/