पत्नी, सासू, सासरे यांच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नी, सासू, सासरा यांच्या त्रासाला कंटाळून येरवडा प्रीझन प्रेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने  राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा येथे समोर आली आहे. याप्रकरणी पत्नी, सासू, सासरा यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

श्रीकृष्ण रखमाजी अवसरे असे आत्महत्या कऱणाऱ्याचे नाव आहे. तर अरुण रखमाजी अवसरे(२८, चऱ्होली बु.)यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पत्नी करुणा श्रीकृष्ण अवसरे (३०), सासू तुळजाबाई भगवानराव दरवेशी (५१, हैद्राबाद, तेलंगणा), भगवानराव दरवेशी अशा तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यत आला आहे. तर श्रीकृष्ण अरसरे यांनी आत्महत्या केल्याचे १६ जानेवारी रोजी उघडकिस आले होते.

अरुण अवसरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी अरुण अवसरे यांचे भाऊ श्रीकृष्ण अवसरे हे येरवडा कारागृहातील प्रेसमध्ये नोकरीस होते. त्यांना दोन मुलं आहेत. लग्न झाल्यापासून त्यांची भावजई करुणा ही काहीच काम करत नव्हती. तसेच तिला घरकाम व स्वयंपाक येत नसल्याने पतीनेच घरातील सर्व काम करावे असे तिचे म्हणणे होते. त्यानंतर तिने आपण म्हणेल तसेच पतीने वागले पाहिजे व पतीवर वर्चस्व राहावे यासाठी श्रीकृष्ण यांनाच ती धुणी भांडी, स्वयंपाक अशी घरातील काम करायला लावत असे. त्यासोबतच ती वारंकावर किरकोळ कारणावरून त्यांच्या खोट्या तक्रारी करून त्रास देत असे. त्यांच्या सांगण्यावरून त्यांची आई व वडील हे श्रीकृष्ण यांना फोनवरून व घरी येऊन त्यांची मुलगी सांगेल तसेच वागण्याचे सांगून मानसिक त्रास देऊन अपमानित करत होते. त्यांच्याविरोधात खोट्या तक्रारी देऊन जेलमध्ये घालण्याची धमकी देत होते. त्यामुळे त्यांच्या या त्रासाला कंटाळून करुणा ही मुलांसह गावाला गेलेली असताना श्रीकृष्ण यांनी प्रिझन प्रेस कॉलनीतील राहत्या घरी १५ जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल वाघमारे करत आहेत.