पेट्रोलची शंभरी, फेब्रुवारीमध्ये 12 वेळा इंधन दरवाढ; गॅस दरवाढीमुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  फेब्रुवारी महिन्यामध्ये पेट्रोलियम कंपन्यांकडून तब्बल 12 वेळा इंधन दरवाढ केली आहे. त्यामुळे देशात पहिल्यांदाच साधे पेट्रोलचा लिटर दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. त्या पेट्रोल 5.73 रुपायंनी महाग झाले आहे. गॅसदरवाढीमुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. सततच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांनी डोळे पांढरे केले आहेत. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

घरगुती वापराच्या गॅसची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता जंगलात जाऊन सरपण आणायचे आणि स्वयंपाक करायचा का, असा संतप्त सवाल गृहिणींनी उपस्थित केला आहे. धुराचा त्रास होऊ नये म्हणून उज्ज्वला गॅस सामान्यांपर्यंत नेण्याचे काम केंद्र सरकारने केले. मात्र, आता गॅस सिलिंडरच्या किमती वाढवून नेमके काय साध्य केले असा सवाल कष्टकरी महिलांकडून उपस्थित केला आहे.

पेट्रोलियम कंपन्यांची इंधनाचे दर कमी होण्याची सूतराम शक्यता दिसत नाही. देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी २५ पैशांनी महागले आहे. या दरवाढीनंतर राजस्थानातील श्री गंगानगर या शहारत साधे पेट्रोल १००.०७ रूपये झाले आहे. देशात पहिल्यांदाच साधे पेट्रोल १०० रुपयांवर गेलं आहे.

इंधन दरवाढ, गॅस सिलिंडर दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ केली आहे. आज देशभरात सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राजस्थानमधील श्री गंगानगर मध्ये पेट्रोलने शंभरी गाठली. यापूर्वी महाराष्ट्रातील परभणी, मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरात पॉवर पेट्रोल १०० रुपयांवर गेले आहे.

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९६ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८६.९८ रुपये मोजावे लागतील. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८.२५ रुपये आहे. आज पुन्हा महागले इंधन ; पेट्रोल-डिझेल दरवाढ आठव्या दिवशी सुरूच आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ८९.५४ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७९.९५ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९१.६८ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.०१ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९०.७८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८३.५४ रुपये झाला आहे.बंगळुरात पेट्रोल ९१.५४ रुपये असून डिझेल ८४.७५ रुपये झाला आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल ०.१९ डॉलरने कमी होऊन ५९.८६ डॉलर झाला आहे. तर ब्रेंट क्रूडचा भाव ६३.३५ डॉलर आहे. त्यात ०.०५ डॉलरची वाढ झाली.

कोरोनामध्ये इंधन मागणीत झाली होती घट

कोरोना रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे जगभरात इंधनाची मागणीत प्रचंड घट झाली होती. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव जवळपास तीन महिने स्थिर होते. मात्र त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला. मागील १० महिन्यात पेट्रोल सरासरी १९ रुपयांनी तर डिझेल सरासरी १७ रुपयांनी महागले आहे. या दरवाढीने दोन्ही इंधनांनी आतापर्यंतची विक्रमी पातळी गाठली आहे.

इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस खासदार राहून गांधी यांनी दोन उद्योजकांसाठी केंद्र सरकारची इंधनलूट अशी बोचरी टीका केली आहे. विविध राज्यांमध्ये इंधन दरवाढीवरून भाजपत्तेर राजकीय पक्षांनी आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला आहे. पेट्रोलवर ६१ टक्के तर डिझेलवर ५६ टक्के कर आहे.

काही दिवसांपूर्वी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील इंधन दरवाढीवरून मोदी सरकारला लक्ष्य केले होते. स्वामी यांनी भारतातील इंधन दराची तुलना शेजारच्या नेपाळ आणि श्रीलंकेशी केली होती. आपल्या ट्विटमध्ये स्वामी यांनी म्हटले होते कि सीतेच्या नेपाळमध्ये आणि रावणाच्या लंकेत इंधन स्वस्त आहे तर रामाच्या भारतात इंधन महाग अशी तुलना त्यांनी केली होती.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलवर मोठया प्रमाणात कर असल्याने ग्राहकांसाठी ते आवाक्याबाहेर गेले आहे. मात्र इंधन दर कमी करण्यासाठी शुल्क कपातीची शक्यता पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलमधील दरवाढ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.