चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने; 90 ते 100 KM वेगाने वारे वाहण्याचा अंदाज, गोवा, कोकणाला चक्रीवादळाचा मोठा फटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तोक्ते चक्रीवादळाने आता अति तीव्र स्वरुप धारण केले असून ते आता किनारपट्टीपासून दूर जात आहे. मात्र, त्याच्या परिघामध्ये आता मुंबई, ठाणे, पालघर या परिसर येत असून पुढील ३ तास या परिसरासाठी अतिशय महत्वाचे राहणार आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. गोवा आणि कोकणात या चक्रीवादळाने रात्रभर धुमाकुळ घातल्यानंतर आता ते अधिकाधिक खोल समुद्राकडे सरकत आहे.

मुंबई किनारपट्टीपासून हे चक्रीवादळ आता १६० किमी दूर समुद्रात असून ते गुजरातच्या दिशेने सरकत आहे. आज पहाटे ते वेरावळपासून २५० किमी अंतरावर होते. त्याचवेळी चक्रीवादळाचा वेगही वाढत चालला आहे. सध्या ते ताशी २० किमी वेगाने पुढे सरकत आहे. हे पहाता हवामान विभागाच्या पहिल्या अंदाजापेक्षा हे अति तीव्र चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर सोमवारी सायंकाळीच पोहचणार आहे. पोरबंदर ते भावनगर जिल्ह्यातील महुवा या दरम्यान आज रात्री ८ ते ११ वाजण्याच्या दरम्यान किनार्‍यावर धडकणार आहे. यावेळी या चक्रीवादळातील वार्‍याचा वेग ताशी १५५ ते १६५ किमी असणार आहे.

रायगड जिल्ह्यात समुद्र किनार्‍याजवळ राहणार्‍या ७ हजार ८६६ नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार रायगडमधील ५ घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर १८१ घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. या वादळात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडपडी झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

गोव्याला मोठा फटका
गोव्यात या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. ताशी १४५ ते १६० किमी वेगाने वाहणार्‍या या वादळाने झाडे उन्मळून पडली. घराची छपरे उडाली. महाराष्ट्रातून गोव्याला वीज पुरवठा करणारी २२० केव्ही वीज वाहिनी निकामी झाली आहे. त्यामुळे गोव्यातील अनेक ठिकाणचे ३३ केव्ही फीडर बंद झाले आहेत. गोव्यात पहाटे ४ वाजल्यापासून चक्रीवादळाचा प्रभाव वाढला होता. वीज खांब पडून वीज पुरवठा खंडित झाला आहे. समुद्रातील मालवाहू जहाजे भरकटल्या आहेत. छोट्या बोटींचे मोठे नुकसान झाले. उंच लाटा किनार्‍याला आदळून काही भागात लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.