हैदराबादच्या युवकाची अमेरिकेत निघृण हत्या, कुटुंबियांनी केली सरकारकडे ‘ही’ मागणी

हैदराबाद : वृत्तसंस्था – अमेरिकेतील जॉर्जियामध्ये एका भारतीय युवकाची चाकूनं वार करून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर युवक हैदराबादचा रहिवासी आहे. त्याच्या शरीरावर अनेकवेळा चाकूनं वार केल्याचं सांगितलं जात आहे. त्याचा मृतदेह घराबाहेरच आढळला होता. आता पीडित कुटुंबानं अंत्यसंस्कारासाठी सरकारकडे मागणी केली आहे.

या युवकाच्या कुटुंबीयांनी अशी मागणी केली आहे, की अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेत जाण्यास मदत करावी. या मृत युवकाचं नाव मोहम्मद आरिफ मोहिउद्दीन असल्याचं सांगण्यात येत आहे. तो गेल्या 10 वर्षांपासून जॉर्जिया किराणा स्टोर चालवत होता.

मोहम्मद आरिफची पत्नी मेहनाज फातिमा म्हणाली, “मी सरकारकडे, माझी आणि माझ्या वडिलांची इमर्जंसी व्हिजावर जाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. जेणेकरून आम्हाला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करता येतील.

असंही म्हटलं जात आहे, की संबंधित घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ग्रोसरी स्टोरमध्ये अनेक हल्लेखोरांसोबत एक कर्मचारीही दिसत आहे.

फातिमानं सांगितलं, की रविवारी सकाळी साधारणपणे 9 वाजताच्या सुमारास मी आरिफला फोन केला होता. यावेळी अर्ध्या तासानं पुन्हा फोन करतो असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र त्यांनी मला कुठलाच कॉल केला नाही. यानंतर पतीच्या बहिणीकडून मला समजलं, की काही अज्ञात लोकांनी चाकूनं वार करून त्यांची हत्या केली आहे. सध्या जॉर्जियातील एका रुग्णालयात आरिफचा मृतदेह आहे. तिथं कुटुंबातील कुठलाही सदस्य उपस्थित नाही.

तेलंगणातील पक्ष मजलिस बचाओ तहरीकचे (MBT) प्रवक्ते उल्लाह खान यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेतील भारतीय दूतावासाला मृत आरिफच्या कुटुंबीयांच्या वतीनं पत्र लिहिलं आहे.