खळबळजनक …! गुणरत्न सदावर्तेंना खासदार उदयनराजेंचीही धमकी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा आरक्षण विरोधात अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे. आज  याचबाबत न्यायालयात सुनावणी होती पण आज न्यायालयाच्या आवारात अॅड सदावर्ते यांच्यावर हल्ला झाला. वैजनाथ पाटील असे या व्यक्तीचे नाव असून तो मुळचा जालना येथील आहे. याबाबत उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना माहिती देत असताना, सदावर्ते यांनी गंभीर आरोप केला आहे. आपल्याला आलेल्या हजारभर  धमक्यांमध्ये साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीनेही धमकीचा समावेश असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.

दरम्यान, “आरक्षणाविरोधात याचिका केल्यानंतर आपल्याला हजारभर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या असून याबाबत भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तसंच मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे,” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

गुणरत्न सदावर्ते यांना संरक्षण देण्याचे आदेश 
दरम्यान, अॅड  गुणरत्न सदावर्ते यांच्यावरील हल्ल्याचा मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. सदावर्ते यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. मात्र इथल्या पोलिसांनी सहकार्य केलं नाही. त्यांनी आपला छळ केला, असा आरोपही सदावर्ते यांनी केला आहे. तसंच पोलिसांनी सदावर्तेंना मीडियाशी बोलण्यासही मज्जाव घातला आहे.

गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला
मीडियाशी संवाद साधल्यानंतर आपल्या कार्यालयात परतत असताना, एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवरील सुनावणीच्या कामाकाजाबद्दल मीडियाला माहिती सांगत होते. ते आटोपल्यानंतर सदावर्ते परतण्यासाठी निघाले असता, एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत, वैजनाथ पाटीलने त्यांच्यावर हल्ला केला. बेसावध असलेल्या सदावर्तेंना बचावासाठी वेळच मिळाला नाही. त्याने सदावर्तेंच्या चेहऱ्यावर बुक्के मारले. यात सदावर्तेंचा चष्माही खाली पडला. गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका का केली, असा प्रश्न करत त्याने शिवीगाळही केली.

सदावर्तेंवर हल्ला करणारा वैजनाथ पाटील कोण आहे ?
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा वैजनाथ मुकणे पाटील हा जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा गावचा रहिवाशी आहे. गेल्या चार महिन्यापासून तो पुण्याला नोकरीच्या शोधात गेला होता. आई-वडील गावाकडे शेती करतात. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे.

मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल 
सरकारने ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचे सांगत सदावर्ते यांनी याचिका दाखल केली असून आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. दरम्यान, राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला संरक्षण मिळाले असून राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय न्यायालयाकडून या आरक्षणाला स्थगिती देता येणार नाही.