खिलाडी अक्षय कुमार आणि रजनीकांत सेटवर  बोलायचे मराठीत 

मुंबई  : वृत्तसंस्था – दक्षिण  चित्रपट सृष्टीतले  सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार यांनी  ‘२.०’  चित्रपटात दोघांनी एकसाथ काम केले आहे. ‘२.०’ या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत काम केलेल्या अक्षय कुमारनं त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सांगितल्या. रजनीकांत हे महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यामुळे सेटवर जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा एकमेकांशी मराठीतूनच बोलायचो. मी मुंबईत राहिल्यानं मला मराठी येते आमच्या गप्पा या बऱ्याचदा मराठीतून व्हायच्या असं म्हणत अक्षयनं रजनीकांत यांच्या बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

रजनीकांत यांच्यासोबत जास्तीत जास्त दिवस काम करायला मिळालं याचा मला खूपच आनंद झाला. ते खूप नम्र स्वभावाचे आहेत. ते जसे आहेत तसेच आहेत. कधीही ते दिखावा करण्याचा प्रयत्न करत नाही. दिसण्याच्या बाबतीतही ते फार विचार करत नाही. तुम्ही कधीही त्यांना भेटायला जा ते जसे आहेत तसेच तुमच्यासमोर येतील असंही अक्षय म्हणाला.

 २.० चित्रपटाच्या निमित्तानं दोन सुपरस्टार पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. विशेष म्हणजे अक्षयचा हा पहिलाच दाक्षिणात्य सिनेमा असणार आहे. या चित्रपटात मी जरी खलनायकाची भूमिका करत असलो तरी रजनीकांत सरांसोबत काम करण्याचं समाधान आणि आनंद खूपच वेगळा होता असंही अक्षय म्हणाला. ‘२.०’ हा ‘रोबोट’ चित्रपटाचा सिक्वल आहे. भारतातील हा सर्वात मोठा बजेट असलेला चित्रपट असून त्यासाठी जवळपास ५०० कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले आहेत. २.० हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे.