ICC World cup 2019 : यंदा झालेल्या ‘या’ बदलामुळे ‘बलाढ्य’ संघांनाही बसू शकतो मोठा ‘धक्का’

इंग्लड : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला आजपासून सुरुवात झाली. यंदा विश्वचषकात काही बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे स्पर्धेत तब्बल २७ वर्षांनी राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने संघ एकमेकांसोबत खेळतील. या पद्धतीने स्पर्धेत मोठी रंगत येणार आहे. चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असू शकते. परंतू स्पर्धेतील टॉपच्या संघाना याचा धोका होऊ शकतो.

१९९२ च्या विश्वचषकात राउंड ऱॉबिन आणि नॉकआऊट पद्धत अवलंबली गेली होती. त्यानंतर ती यंदा वर्ल्डकपला अवलंबली जाणार आहे. या पद्धतीनुसार स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक संघाची एकमेकांशी लढत होते. यात कोणत्याही संघाला कमी जास्त करता येत नाही. प्रत्येक संघाला आपले कर्तृत्त्व दाखवण्यची संधी मिळते.

यंदा स्पर्धेत भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान या संघांना दावेदार मानलं जात आहे. मात्र या पद्धतीमुळे वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघही टॉप ४ मध्ये पोहचू शकतात.

१९९२ च्या विश्वचषकावेळी न्यूझिलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचले होते. राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीनुसार १ नंबरचा न्यूझिलंड आणि ४ नंबरवर असलेला पाकिस्तान यांच्यात लढत झाली. तेव्हा इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने ४ विकेटने न्यूझिलंडवर विजय मिळवला आणि फायनलमध्ये जागा मिळवली. तर दुसऱ्या नंबरवर असणारा इंग्लड आणि तिसऱ्या नंबरवरील दक्षिण आफ्रिकेसोबत सामना झाला होता. यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत फायनलमध्ये जागा मिळवली होती.

राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीत सर्व संघ एकमेकांशी लढतात. यंदा स्पर्धेत १० संघांचा सहभाग आहे. प्रत्येक संघाला ९ सामने खेळवण्यात येतील. यातील टॉपचे ४ संघ सेमीफायनलला पोहचतील. त्यानंतर बाद फेरी होईल. यात पहिल्या क्रमांकावरील संघ आणि चौथ्या क्रमांकावरील संघांची लढत होईल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघ लढतील.

दरम्यान, विश्वचषकाच्या इतिहासात ग्रुप स्टेज आणि नॉकआउट, ग्रुप स्टेज आणि सुपर सिक्स, राउंड रॉबिन आणि नॉकआउट या तीन पद्धती अवलंबल्या गेल्या. १९७५ ते १९८७ पर्यंत चार वर्ल्ड कप स्पर्धेत ग्रुप स्टेज आणि नॉकआउट पद्धत वापरली गेली. १९९२मध्ये राउंड़ रॉबिन पद्धतीने सामने खेळले गेले. त्यानंतर १९९६ ला पुन्हा ग्रुप स्टेज आणि नॉकआउट पद्धतीने स्पर्धा झाली. १९९९ ते २००३ या काळात ग्रुप स्टेज आणि सुपर सिक्स पद्धत अवलंबली गेली. त्यानंतर २००७ ते २०१५ दरम्यान तीन वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेज आणि नॉकआउट पद्धतीने सामने झाले.