आता भारतात ‘पोर्टल’वर मिळणार देश-विदेशात विकसित होणाऱ्या ‘कोरोना’विरुद्धच्या ‘वॅक्सीन’शी संबंधित सर्व माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय आयसीएमआर आता कोरोना संबंधित माहिती देण्याआठी आता एक पोर्टल तयार करत आहे. पुढील आठवड्यापर्यंत हे पोर्टल सुरु होईल. यावर भारतासोबतच अन्य देशांमध्ये तयार होत असलेल्या वॅक्सीनची माहिती इंग्रजी सोबतच अनेक प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध असणार आहे. आयसीएमआर मधील संसर्ग रोग विभाग प्रमुख समीरन पांडा यांनी सांगितले की, या पोर्टलचा उद्देश लोकांना एका प्लॅटफॉर्मवर कोरोना वॅक्सीनशी संबंधित माहिती देणे हा आहे.

जास्तीत जास्त लोकांना मिळणार वॅक्सीनची माहिती

समीरन पांडा यांनी सांगितले की, पुढील आठवड्यापर्यंत हे पोर्टल सुरु होईल.प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध होणाऱ्या माहितीबद्दल ते म्हणाले की, जास्तीत जास्त लोकांपर्यंत या वॅक्सीनची माहिती पोहचली पाहिजे. या पोर्टलवर टप्प्याटप्प्याने माहिती उपलब्ध करून दिली जाईल. पहिल्या टप्प्यात अन्य देशांमध्ये तयार होत असलेल्या वॅक्सीनची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. हळूहळू यावर इतर रोगांवर रोगप्रतिकारासाठी असलेल्या औषधांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दोन-तीन महिन्यात लॉन्च होणार कोरोना वॅक्सीन

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले की, देशात कोरोना वॅक्सीनचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरु झाले आहे. येणाऱ्या दोन-तीन महिन्यात कोरोना वॅक्सीन तयार होईल अशी आशा आहे. डॉ हर्षवर्धन यांनी शनिवारी कमला नेहरू येथील एनडीआरएफ मध्ये बनवल्या गेलेल्या कोविड-19 रुग्णालयाचे उदघाटन केले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, अशा प्रकारे रुग्णालय बनवणारी ही पहिलीच बटालियन आहे. अशा प्रकारचे आणखी 13 रुग्णालये बनवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 20 बेडची सोय असणारे हे रुग्णालय आपत्तीग्रस्त भागात घेऊन जाता येऊ शकतात.

भारतात तीन वॅक्सीनची चाचणी

भारतात सध्या तीन कोरोना वॅक्सीनची चाचणी सुरु आहे. यापैकी दोन स्वदेशी आणि एक विदेशी कंपनीद्वारे विकसित करण्यात आलेल्या वॅक्सीनचा समावेश आहे. ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने बनवलेल्या वॅक्सीनची चाचणी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट मध्ये तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरु आहे. भारत बायोटेक आणि कॅडिलाच्या वॅक्सीनचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी अशी आशा व्यक्त केली की जर कोरोनावरील वॅक्सीन सापडली तर, येणाऱ्या दोन वर्षांच्या काळात कोरोना पूर्णपणे संपेल.