…तर CBI ची टीमही होणार क्वारंटाईन, मुंबई पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसेच मुंबई पोलिसांनी आतापर्यंत जमा केलेले पुरावे सीबीआयला देऊन त्यांना तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे राज्यातील ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुशांत सिंह राजपूतचा तपास सीबीआयकडे दिल्यानंतर गुरुवारी (दि.20) सीबीआयचे अधिकारी मुंबईत दाखल होणार आहेत. मात्र, मुंबईत आल्यानंतर या अधिकाऱ्यांना पालिका क्वारंटाईन करणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणासंदर्भात मुंबईत आलेल्या बिहार पोलीस दलातील एका अधिकाऱ्याला मुंबई पालिकेने क्वारंटाईन केले होते. यानंतर मुंबई पोलिसांवर सुशांतच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला होता. विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधत मुंबई पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता हा तपास सीबीआयकडे सुपुर्द करण्यात आला असून सीबीआयचे अधिकारी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे त्यांनाही क्वारंटाईन करणार का ? याबाबत महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले की, जर सीबीआयची टीम केवळ सात दिवसांसाठी मुंबईत आली तर त्यांना क्वारंटाईन करण्यापासून सूट देण्यात येईल. परंतु ते सात दिवसांपेक्षा अधिक दिवस मुंबईत येणार असतील तर त्यांना क्वारंटाईनमधून सूट मिळवण्यासाठी मेल करावा लागेल. त्यानंतरच त्यांना क्वारंटाईनमधून सूट दिली जाईल, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले आहे.

सीबीआयच्या पथकाकडे सात दिवसांचं रिटर्न तिकीट असेल तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार नाही, असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. त्याहून अधिक काळासाठी ते मुंबईत येणार असतील तर त्यांना कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करावे लागेल, असेही महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.