मोदी सरकारचा मोठा निर्णय ! NEET-PG परीक्षा 4 महिने पुढे ढकलली, मेडिकलच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी करणार Covid ड्युटी

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून मनुष्यबळाचीही कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नीट (NEET-PG) ही परीक्षा 4 महिने पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवी तारीख परीक्षेच्या एक महिना अगोदर जाहीर केली जाईल. तसेच इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांनाही आता कोरोनारुग्णांची सेवा बजावण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सेवा बजावत असलेल्या डॉक्टरांवरचा कामाचा ताण कमी व्हायला मदत होणार आहे.

इंटर्नशीप करणारे डॉक्टर वरिष्ठांसोबत राहून करोना रुग्णांवर उपचार करतील. फोनच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला देण्यासाठी तसेच सौम्य लक्षण असलेल्या कोरोना रुग्णावर उपचारासाठी या डॉक्टरांची मदत होणार आहे. पदव्युत्तर शिक्षणाच्या अंतिम वर्षाला असलेले विद्यार्थ्यांनाही निवासी डॉक्टर्स म्हणून काम करता येणार आहे. तसेच बीएससी किंवा जीएनएम शिक्षण घेतलेल्या नर्सना देखील कोरोना काळात वरिष्ठांच्या हाताखाली काम करण्यासाठी नेमले जाणार आहेत. कोरोना काळात ड्युटीचे कमीतकमी 100 दिवस पूर्ण केल्यानंतर हे वैद्यकीय कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी पात्र ठरणार आहेत. त्यांना शासकीय सेवेत प्राधान्य दिले जाणार आहे. कोरोना काळात काम केलेल्या या कर्मचाऱ्याचे लसीकरण केले जाणार आहे. तसेच भारत सरकारच्या आरोग्य सेवकांसाठीच्या इन्शुरन्स योजनेचाही लाभ घेता येईल. कमीत कमी 100 दिवस ड्युटी केल्यानंतर या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून सन्मानित केले जाणार आहे.