२०१९ मध्ये सत्तांतर निश्चित : पृथ्वीराज चव्हाण

अकोला : पोलीसनामा आॅनलाइन – देशात महागाईसह बेरोजगारी वाढली असून यावर आवाज उठविणारे नेते, प्रसारमाध्यमे यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पुन्हा मोदी सरकार सत्तेत आल्यास देशात हुकूमशाही येईल, अशी भीती व्यक्त करून धर्मनिरपेक्ष पक्षांची अपेक्षेप्रमाणे आघाडी झाल्यास २०१९ मध्ये सत्तांतर निश्चित होईल, असा आशावाद माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकारा परिषदेत ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले, की मागील निवडणुकीदरम्यान भाजपाने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. जुन्या शासनाच्या योजना नव्याने पुढे आणून सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेमध्ये उद्रेक आहे. सरकारचे आयात-निर्यात धोरण चुकले असून, नोटबंदीचा फसलेला निर्णय, जीएसटी कायद्यामुळे प्रचंड मोठी तूट निर्माण झाली आहे. देशात चार लाख कोटी काळापैसा असल्याने नोटबंदीमुळे असा काळापैसा लोक जाळून टाकतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ९९.३ टक्के नोटा बदलून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे काळापैसा कुठे आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
भाजप सरकारने राफेलमध्ये ३० हजार कोटींचा सर्वात मोठा घोटाळा केला आहे. याबाबत बोलणाऱ्या नेत्यांवर सीबीआयद्वारे कारवाई करण्यात येत असून, प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा भाजप सरकार सत्तेवर आल्यास देशात हुकूमशाही येणार आहे. सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी आघाडी करून लोकशाहीला वाचविण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. त्यामुळे २०१९ मध्ये सत्तांतर निश्चित असून, धर्मनिरपेक्ष पक्षांची सत्ता येईल, असे चव्हाण म्हणाले.