जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून वनाधिकाऱ्याची हत्या

श्रीनगर : वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका वन विभागाच्या अधिकाऱ्याची घरात घुसून हत्या केली. तारिक अहमद मलिक (वय ३८) असे ठार झालेल्या वनाधिकाऱ्याचे नाव आहे.

प्राथमिक तपासात या घटनेमागे बडगाम जिल्ह्यामध्ये राहणारा लष्कर-ऐ-तोयबाचा अतिरेकी युसूफ दार उर्फ कंतरो असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बुधवारीदेखील दहशतवाद्यांनी पुलवामा येथे पोलीस निरीक्षक मोहम्मद अश्रफ दार यांची गोळ्या घालून हत्या केली होती. प्राथमिक तपासामध्ये या हल्ल्यामागे हिजबूल मुजाहिद्दीनचा हात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. अधिकाऱ्यावर होणाऱ्या अशा भ्याड हल्ल्यांचा निषेध करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B0002E3MP4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a84e498d-a75d-11e8-9791-613e21de1c41′]

जम्मू-काश्मिरमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून अतिरेक्यांच्या कारवाया वाढत चालल्या आहेत. काही स्थानिकांकडून दहशतवाद्यांना सहकार्य मिळत असल्याने दहशतवाद्यांच्या कारवायांना बळ मिळत आहे. बकरी ईदच्या दिवशीही जम्मू-काश्मिरमध्ये अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांवर दगडफेक झाल्याने देशभरात या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात आला होता.