शिक्रापुरात चक्क ATM मशीनच चोरट्यांनी लांबविले; तब्बल 19 लाख 50 हजार रुपये लंपास, महिलांच्या वेशात येऊन केली चोरी

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पिंपळे जगताप, शिक्रापूर येथे एटीएम चोरीचे घडलेले प्रकार ताजे असताना आता चोरट्यांनी शिक्रापूर येथील पाबळ चौक परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे १९ लाख ५० हजार रुपये रक्कम असलेले एटीएम मशीनच स्कोर्पिओ वाहनात टाकून गायब केले असून दुसऱ्या एका मशीनची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना घडली शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथील पाबळ चौक परिसरात जातेगाव रोड येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या शेजारीच एटीएम सेंटर असून त्यामध्ये दोन एटीएम मशीन आहेत, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास काही अज्ञात चोरटे स्कोर्पिओ वाहनातून त्या ठिकाणी आले आणि त्यांनी एक एटीएम मशीनची तोडफोड करून दुसरे एटीएम मशीन वाहनाच्या सहाय्याने बाहेर काढून त्यांनी आणलेल्या स्कोर्पिओ वाहनात टाकून पळवून नेले, याबाबतची माहिती सकाळी मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, अमोल खटावकर, होमगार्ड सागर इंगवले, स्वप्नील खैरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, राजू मोमीन, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे यांनी त्याठिकाणी जात पाहणी करत पंचनामा केला असताना एटीएम सेंटरचे दरवाजे, काचा फुटलेल्या तसेच एटीएम मशीनचे अनेक तुटलेले भाग आढळून आले, याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर एटीएम मशीनचे व्यवस्थापक यांनी सीसीटीव्ही च्या माध्यमातून पाहणी केली असताना चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी चक्क गाऊन परिधान केला असल्याचे समोर आले, त्यांनतर सदर एटीएमचे व्यवस्थापक यांनी त्या ठिकाणी येऊन चौकशी केली असता एटीएम मशीन मधील तब्बल १९ लाख ५० हजार रुपये चोरी गेले असल्याचे समोर आले. याबाबत हिराप्पा चंडाप्पा मेलकरी वय ३२ वर्षे रा. गोंधळेनगर हडपसर पुणे मूळ रा. खेड उमरगा पोस्ट चलगीरा ता. आळण जि. कुलयुर्गी कर्नाटक यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चार आरोपींवर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट हे करत आहे.

बँकेच्या अधिकाऱ्यांना जाग कधी येणार …….
शिक्रापूर सह परिसरात अनेक ठिकाणी एटीएम चोरीचे गंभीर प्रकार घडत असताना देखील अनेक एटीएम सेंटरला सुरक्षारक्षक नाहीत तसेच बँक प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील बँकेला तसेच एटीएम सेंटरला सुरक्षारक्षक नेमले जात नाहीत त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांना जाग कधी येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.