बसमध्ये महिलांच्या आरक्षित जागेवर बसणे पडेल महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पीएमपी मध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या जागांवर बऱ्याचदा पुरुष बसलेले असतात . त्यामुळे काहीवेळा आरक्षण असून देखील महिलांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो . मात्र आता बुधवार दि २३ पासून म्हणजे आज पासून महिलांसाठी आरक्षित जागांवर बसनाऱ्या पुरुष प्रवाशाविरुद्ध पोलीस कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रवासी महिलेला आरक्षित जागा मिळेल याची जबाबदारी संबंधित वाहक-चालकांचीच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबत आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पीएमपीने मंगळवारी दिल्या आहेत .

बसमध्ये डावीकडील आसनांची रांग महिलांसाठी आरक्षित आहे. पण त्यावर बऱ्याचदा पुरुष प्रवासी बसलेले निदर्शनास येते आहे. यावरून काहीवेळा महिला आणि वाहक -चालक यांच्यात वाद होताना देखील निदर्शनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित जागा त्यांनाच उपलब्ध करून देण्यासाठी नियमावली तयार केली आहे, अशी माहिती पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी दिली.

तक्रारीकरिता हेल्पलाईन

महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आरक्षित जागा त्यांना उपलब्ध न झाल्यास याबाबत प्रवाशांनी पीएमपीच्या हेल्पलाइनवर (दूरध्वनी क्रमांक ०२०-२४५४५४५४) संपर्क साधून तक्रार करावी.