सिव्हीलमध्ये मृतदेहाचा गोंधळ, दोन ब्रदरची तडकाफडकी बदली

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

उपचारादरम्यान मृत्यू झालेली व्यक्तीचा मृतदेह न देता दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना दिल्याप्रकरणी चौकशी समितीने केलेल्या प्राथमिक चौकशीत दोन ब्रदर दोषी आढळले. या दोन्ही ब्रदरची तडकाफडकी बदली करण्यात आली असून या चौकशीचा अहवाल गुरुवारी (दि.२१) अधष्ठातांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने २२ जणांची चौकशी केली आहे.

तासगावचे अविनाश बागवडे यांना अकरा दिवसांपूर्वी उपचारासाठी सांगलीच्या सिव्हीलमधील वॉर्ड क्रमांक 63 मध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री त्यांना संसर्गजन्य कक्षात हलविण्यात आले होते. त्यांच्यासोबत आणखी एक रूग्णही त्याच कक्षात हलविण्यात आला होता. मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास दुसर्‍या रूग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर हॉस्पीटलकडून बागवडे यांच्या नातेवाईकांना फोन करून अविनाश बागवडे यांचा मृत्यू झाल्याचे कळविण्यात आले. शिवाय उत्तरीय तपासणी करायची असल्याने तातडीने येण्याचाही निरोप देण्यात आला होता.

पहाटे बागवडे यांचा बंधू, पुतण्या सिव्हीलमध्ये आले. त्यांनी उत्तरीय तपासणी केंद्रात मृतदेह पाहून तो अविनाश यांचा नसल्याचे सांगितले. तरीही त्यांना घाई गडबडीत मृतदेह सोपविण्यात आला. यावेळी त्यांना मृत्यूचे प्रमाणपत्रही देण्यात आले. तासगावमध्ये मृतदेह नेल्यानंतर तो बागवडे यांचा नसल्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर बागवडे यांच्या नातेवाईकांनी दुसर्‍याचा मृतदेह परत करून सिव्हील प्रशासनाला धारेवर धरले होते.

या घटनेनंतर तातडीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. समितीने केलेल्या प्राथमिक चौकशीत दोन ब्रदर दोषी आढळल्याने त्यांची मिरजेला बदली करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत. दरम्यान समिती गुरुवारी चौकशीचा अहवाल अधिष्ठातांना सादर करणार आहे. त्यानंतरच या प्रकरणातील दोषींची नावे समजणार आहेत.