Photo : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले वेगळ्या स्टाईलने रस्त्याचे उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मेडद (ता. बारामती) येथील पाणंद रस्त्याचे उद्घाटन वेगळ्या पद्धतीने केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी थेट जेसीबीचे स्टेअरिंग हाती घेऊन पाणंद रस्त्याचे उद्घाटन वेगळ्या स्टाईलने केले.

मेडद येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून आणि शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेच्या माध्यमातून येथील आरटीओ कार्यालयापासून ते कऱ्हा नदी बंधाऱ्यापर्यंत पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीस सुरुवात करण्यात आली होती. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख देखील उपस्थित होते. यावेळी रस्त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

तत्पूर्वी, ग्रामस्थांच्या सजवलेल्या बैलगाडीतून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे कार्यक्रमस्थळी पोहचले. यावेळी बैलगाडीचे सारथ्यदेखील जिल्हाधिकारी देशमुख यांनी केली. पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत बारामती मध्ये एकूण 189 किमीचे 133 रस्ते प्रस्तावित केले होते. यापैकी 14 किमीची 13 कामे पुर्ण झाली आहेत. ही सर्व कामे लोकसहभागातून होणार असून मे महिनाअखेर सर्व कामे पूर्ण होतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.