केंद्र सरकारचा महत्वाचा निर्देश ! आता 1 नव्हे तर 2 महिन्यानंतर दिला जाणार कोविशील्डचा दुसरा ‘डोस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतात कोरोना व्हायरस महामारीच्या वाढत्या प्रकोपासह लसीकरण अभियान सुद्धा खुप वेगाने सुरू आहे. देशात आतापर्यंत 4.5 कोटीपेक्षा जास्त कोरोना व्हॅक्सीनचे डोस दिले गेले आहेत. या दरम्यान केंद्र सरकारकडून सोमवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविशील्डबाबत महत्वाचे निर्देश दिले गेले आहेत.

सरकारचे म्हणणे आहे की, आता कोविशील्डच्या पहिल्या आणि दुसर्‍या डोसमधील अंतर वाढवण्यात आले आहे. हे अंतर आता किमान 6 ते 8 आठवड्यांचे करण्यात आले आहे. यापूर्वी कोविशील्डचा दुसरा डोस 4 ते 6 आठवड्यांमध्ये दिला जात होता. व्हॅक्सीनवर नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्यूनायजेशन आणि नॅशनल एक्सपर्ट ग्रुपच्या सल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारचे म्हणणे आहे की, हा निर्णय केवळ कोविशील्डसाठी घेण्यात आला आहे. कोव्हॅक्सिनवर हा लागू होणार नाही.

पाच राज्यांमध्ये वेगाने वाढत आहे संसर्ग

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सोमवारी सांगण्यात आले की, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशात कोविड-19 ची प्रकरणे वाढत आहेत आणि संसर्गाच्या नव्या प्रकरणांच्या बाबतीत या राज्यांची भागीदारी 80.5 टक्के आहे. भारतात कोरोना व्हायरस संसर्गाची 46,951 नवी प्रकरणे समोर आली, जी या वर्षातील एका दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. महाराष्ट्रात 30,535 नवी प्रकरणे समोर आली जी एका दिवसात समोर येणार्‍या प्रकरणांची सर्वात जास्त संख्या आहे.