IND vs AUS : कमाल कोहली , मोडला सचिनचा विक्रम

सिडनी : वृत्तसंस्था – सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवशी चांगली सुरूवात केली आहे. पहिल्या दिवसअखेर भारताने ४ बाद ३०३ अशी मजल मारली. या सामन्यात पुजाराने मालिकेतील तिसरे शतक ठोकले आणि विक्रम केला. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहलीने आजच्या सामन्यात १९ हजार आंतराराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. महत्वाचे म्हणजे त्याने हा पराक्रम करत सचिनचा विक्रम मोडला.
कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३९९ डावांत १९ हजार धावांचा टप्पा गाठला. तर हाच पराक्रम करण्यासाठी सचिनला ४३२ डाव खेळावे लागले होते. इतकेच नव्हे तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कोहलीने सर्वात जलद १८ हजार धावांचा टप्पा गाठला होता. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार, १६ हजार आणि १७ हजार धावांचा टप्पादेखील कोहलीनेच प्रथम पूर्ण केला होता.
कोहली मैदानावर आला तेव्हा भारत भक्कम स्थितीत होता. पुजारा आणि मयंक अग्रवाल यांच्यात झालेल्या ११६ धावांच्या चांगल्या भागीदारीमुळे भारताला मोथजी धावसंख्या उभारण्याची संधी होती. कोहलीला अपेक्षेप्रमाणे चांगली सुरुवात देखील मिळाली, पण तो २३ धावा करून बाद झाला. हेजलवूडच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. पण असे असले तरी कोहलीने एक विक्रम आपल्या नावे केला.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी स्विकारली. पहिल्या  दिवसाच्या  संपूर्ण  खेळावर भारतीय संघाचे वर्चस्व राहिले. पुजाराने मालिकेतील तिसऱ्या शतकाची नोंद केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शतकवीर पुजारा १३०, तर हनुमा विहारी ३९ धावांवर नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवुडने दोन बळी घेतले. नॅथन लायन आणि मिशेल स्टार्कने प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ऐतिहासिक मालिका विजयाची संधी भारतीय संघाजवळ आहे.