Ind Vs Aus : स्टीव्हच्या नाबाद शतकाने ऑस्ट्रेलिया 300 पार, स्मिथचे 27 वे शतक

सिडनी : आयसीसीच्या बॅटिंग क्रमवारीत जगात तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) याने आपल्या आक्रमक खेळीचे प्रदर्शन सिडनीतील तिसर्‍या कसोटी सामन्यात (Test match) दाखवून दिले़ स्टीव्हच्या नाबाद शतकामुळे ऑस्ट्रेलियाने ७ गड्यांच्या मोबदल्यात ३००धावांचा आकडा पार केला आहे. स्टिव्ह स्मिथ याने आतापर्यंत ७५ कसोटी सामन्यात २६ शतके केली होती. त्यात तीन द्विशतकांचा समावेश आहे़ हे त्याचे २७ वे शतक आहे.

तिसरी कसोटी सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने आम्ही रवीचंद्रन अश्विनच्या विरोधात गेम प्लॅन केला असल्याचे सांगितले होते. त्याचा प्रत्यय या कसोटीत आला आहे. रवींद्र जडेजा याने ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखविला असताना अश्विन मात्र एकही विकेट मिळवू शकला नाही.

ऑस्ट्रेलियाने कालच्या २ बाद १६६ धावसंख्येवरुन आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. लाबुशेन आणि स्थिम यांनी १०० धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने लाबुशेन याला बाद करुन ही भागीदारी संपुष्टात आणली. पहिल्या दोन कसोटीत फ्लॉप शोनंतर या कसोटीत स्मिथ याला सुर गवसला. स्मिथ आणि मॅथ्यु वडे यांनी १०० धावांची भागीदारी केली. बुमराहकरवी झेलबाद करीत जडेजाने ही जोडी तोडली. पाठोपाठ टीम पैनला बुमराहने शुन्यावर तंबूत परतविले. पीट कमिन्स, कॅमेरॉन ग्रीन, स्टार्क हे स्वप्तात परतले. तरीही स्मिथ एका बाजूने आपला किल्ला लढवत होता. त्याने आपले शतक पूर्ण करण्याबरोबरच ऑस्ट्रेलियाला ३०० धावांचा टप्पा पार करुन एक समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्टेलियाच्या ८ बाद ३१४ धावा झाल्या होत्या.