IND Vs ENG : तब्बल 22 वर्षांनंतर भारतीय संघावर ओढवली नामुष्की ! अपराजित राहण्याची मालिका खंडित

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आज इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागाला. भारतीय संघावर तब्बल 22 वर्षांनंतर नामुष्की ओढवल्याचं पहायला मिळालं.

गेल्या 22 वर्षात चेन्नईमध्ये कसोटी सामन्यात भारतीय संघाला एकही पराभव पत्करावा लगाला नव्हता. परंतु चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारतीय संघाला 22 वर्षांनंतर पराभव पत्करावा लागला आहे. यापूर्वी 1999 साली भारताला पराभव स्विकारावा लागला होता. यानंतर चेन्नईमध्ये भारतीय संघ अपराजित राहिला होता. आता पुन्हा एकदा पराभव झाल्यानं भारताची ही विजयी मालिका खंडित झाल्याचं पहायला मिळत आहे.

आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी अव्वल स्थानावर विराजमान होता. परंतु या पराभवानंतर आता भारतीय संघानं हे अव्वल स्थान गमावलं आहे. आता संघ अव्वल स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर गेला आहे. हा पराभव भारतीय संघासाठी एक मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

या क्रमवारीत आता इंग्लंड अव्वल स्थानावर आहे. भारतावर विजय मिळाल्यानंतर इंग्लंडनं हे स्थान पटकावलं आहे. 70.2 अशी इंग्लंडच्या विजयाची टक्केवारी झाली आहे. न्युझिलंड संघ या यादीत दुसऱ्या स्थानावर, ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर तर भारतीय संघ अव्वल स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे. आता भारतीय संघ पुन्हा अव्वल स्थानावर झेप घेऊ शकतो का याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे.

पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा 227 धावांनी पराभव झाला. अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा खराब कामगिरी केली. 197 धावात भारताचा दुसरा डाव संपुष्टात आला. हा विजय मिळवल्यानंतर आता इंग्लंडनं 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

कोरोनानंतर भारतात झालेल्या या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. दोन्ही संघातला दुसरा कसोटी सामना हा चेन्नईमधील याच मैदानावर 13 फेब्रुवारी पासून होणार आहे. हा दुसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत 1-1 अशी बरोबरी करतो का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.