चीनच्या उलट्या बोंबा ! प्रवक्ते म्हणाले – ‘भारतानं जवानांना ताब्यात ठेवावं’

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत-चीन सीमेवर गलवान खोर्‍यात झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. यादरम्यान चीनच्या सरकारी मीडियाने चीनी सेनेच्या हवाल्याने दावा केला आहे की, गलवान घाटीवर नेहमी त्यांचा अधिकार राहिला आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिनजियान यांनी म्हटले आहे की, भारताने सैन्य ताब्यात ठेवावे. सीमारेषा पार करु नये. कुठलीही समस्या निर्माण करु नये आणि एकतर्फी पाऊल उचलू नये. भारतीय लष्कराने काल ही माहिती दिली आहे.

15 जूनच्या रात्री गलवान खोर्‍यात ही हिंसक झडप झाली होती. चीनचेही 43 जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत. गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच असे घडले आहे की, चीन आणि भारतादरम्यान संघर्षात जवान शहीद झाले आहेत. भारतीय सैनिकांनी 15 जून रोजी दोन वेळा अवैध कारणांनी चीनच्या सीमेत प्रवेश केला असा आरोप चीनने केला आहे. चीनच्या सैनिकांना डिवचत त्यांच्यावर हल्ले केले. त्यामुळं दोन्ही सैन्यांमध्ये मारपीट झाली. सोबतच चीनने भारतीय लष्कराच्या ’गलवान व्हॅलीत तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असताना सैनिकांमध्ये झडप झाली’ या दाव्याचा देखील विरोध केला आहे.

चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिनजियान यांना सीमेवर भारतीय सैनिक शहीद झाल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, याबाबत मला माहिती नाही. ते म्हणाले की, आमच्या सैनिकांची एक उच्चस्तरीय बैठक झाली होती आणि सीमेवर स्थिती सामान्य करण्यासाठी सहमती देखील दर्शवली होती. मात्र 15 जून रोजी भारतीय सैनिकांनी सीमेचे उल्लंघन केल्याचे त्यांनी सांगितले.