‘गलवान’मधील हिंसक संघर्षाच्या 3 दिवसानंतर चीननं 2 मेजरसह 10 सैनिकांना सोडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लडाख सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात चिनी सैन्याने भारतीय लष्कराच्या 10 जवानांना ओलीस ठेवले होते. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, चिनीने दोन मेजरसह 10 भारतीय सैनिकांना ओलीस ठेवले होते. त्यांना तीन दिवसांच्या चर्चेनंतर मुक्त करण्यात आले. मात्र सैन्याकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आले नाही. गुरुवारी लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले की, या कारवाईत कोणताही भारतीय सैनिक बेपत्ता नाही. मात्र, जवानांना ओलीस ठेवण्यात आले की नाही याबाबत लष्कराकडून कोणतेही निवेदन अद्याप देण्यात आले नाही, परंतु पीटीआयच्या म्हणण्यानुसार, चिनी सैन्याने दोन मेजरसह 10 जवानांना ओलीस ठेवले होते, ज्यांना तीन दिवसांनंतर सोडण्यात आले आहे.

यापूर्वी जुलै 1962 मध्ये चिनी सैन्याने भारतीय सैनिकांना बंदी बनविले होते. गलवान खोऱ्यातील युद्धाच्या वेळी सुमारे 30 भारतीय सैनिक शहीद झाले आणि चिनी सैन्याने डझनभर सैनिकांना ताब्यात घेतले. ज्यांना नंतर सोडण्यात आले.

गलवान खोऱ्यातील चकमकीत 76 सैनिक जखमी
चिनी सैन्याने सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 76 जवान जखमी झाल्याचे समजते. त्यापैकी 18 गंभीर जखमी झाले, तर 58 मध्यम जखमी झाले. लेह रुग्णालयात 18 जवानांवर उपचार सुरू आहेत, तर 58 जणांना विविध रुग्णालयात दाखल केले आहे. भारतीय आणि चिनी सैन्याच्या अधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी सलग तिसर्‍या दिवशी मेजर- जनरल स्तरावर चर्चा झाली. यामध्ये सैन्य दलादरम्यान झालेल्या चकमकीसोबतच गलवान खोऱ्याच्या आसपासच्या भागात सामान्य स्थिती निर्माण कारण्यासंदर्भात चर्चा झाली. 5 मेपासून भारतीय आणि चिनी सैन्य समोरासमोर आहेत.

5 मे रोजी पांगोंग त्सो येथे भारतीय आणि चिनी सैन्यात चकमक सुरु झाली. गतिरोध सुरू झाल्यानंतर भारतीय सैन्याने पंगोंग त्सो, गलवान खोरे, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी या सर्व वादग्रस्त भागातून चिनी सैन्याला मागे हटवण्यासाठी सैन्याने पावले उचलली पाहिजेत, असा निर्णय घेतला. यासाठी दोन्ही देशांमध्ये अनेक वेळा चर्चा झाली, परंतु सर्व निष्फळ ठरले. 15 जूनच्या रात्री भारतीय सैन्य दलाचे एक दल गलवान खोऱ्याच्या पेट्रोलिंग पॉईंट -14 येथे चिनी सैन्याशी बोलण्यासाठी गेले. यावेळी हल्ल्याच्या प्रतीक्षेत बसलेल्या चिनी सैनिकांनी भारतीय सैन्य दलावर हल्ला केला. या रक्तरंजित चकमकीत भारतीय लष्कराचे 20 सैनिक शहीद झाले, तर चीनलाही मोठे नुकसान झाले.