काय सांगता …! यापुढे एकच सिम कार्ड ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – धमाकेदार ऑफर्स आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे दर आणि योजना यामुळे देशातील दूरसंचार क्षेत्रात सध्या बऱ्याच कंपन्या ग्राहकांकरिता उपलब्ध आहेत. पण येत्या सहा महिन्या दूरसंचार उद्योगात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. ग्राहकांकडे असलेल्या सिम कार्डांमध्ये तब्बल सहा कोटींनी घट होण्याचा अंदाज आहे. ग्राहकांकडून विविध कंपन्यांच्या सिम कार्डचा वापर करण्याऐवजी शक्यतो एकाच कंपनीचे सिम कार्ड वापरण्याचा नवा ट्रेण्ड रूजत असल्याने ही घट होणार आहे. जवळपास सर्वच कंपन्यांकडून एकसारख्या सेवा आणि दर आकारण्यात येत असल्याने हा बदल होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

दूरसंचार उद्योगातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती एअरटेल आणि आयडिया या दोन दूरसंचार सेवा पुरवठादारांनी केवळ अल्प किंमतीच्या रिचार्ज योजना सादर करणाऱ्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी तशाच पद्धतीच्या योजना सादर करण्याची घोषणा केली आहे. विश्लेषकांच्या मते, त्यामुळे आता ग्राहक नवीन सिम कार्ड घेताना या तीनपैकी एकाच कंपनीचे कार्ड घेण्यावर भर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध कंपन्यांकडील एकूण ग्राहकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट २०१८ अखेर देशात एकूण मोबाइल ग्राहकांची संख्या १.२ अब्जांवर पोहोचल्याचे दिसून आले. दूरसंचार उद्योगातील तज्ज्ञांच्या मते आगामी दोन ते तीन महिन्यांत नव्या ग्राहकांच्या संख्येत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या देशात ७.३ कोटी ते ७.५ कोटी ग्राहक एकाच सिम कार्डचा वापर करणारे असून, उर्वरित ग्राहक दोन सिम कार्डचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे. ‘सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे संचालक (सीओएआय) राजन मॅथ्यू यांच्या मते आगामी सहा महिन्यांमध्ये मोबाइलधारकांच्या संख्येत अडीच कोटी ते तीन कोटींची घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका विश्लेषकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार आगामी दोन तिमाहींमध्ये मोबाइलधारकांच्या संख्येत साडेचार कोटी ते सहा कोटींची घट होण्याची दाट शक्यता आहे.

‘डेलॉइट इंडिया’च्या टेक्नॉलॉजी, मीडिया आणि टेलिकम्युनिकेशनचे संचालक हेमंत जोशी यांच्या मते -विविध कंपन्यांच्या चांगल्या आणि आपल्या आवाक्यात असणाऱ्या सेवांचा वापर करण्यासाठी ग्राहकांकडून एकापेक्षा अधिक सिम कार्डचा वापर करण्यात येतो. आपण खर्चत असलेल्या रकमेच्या बदल्यात चांगली आणि किफायतशीर सेवा मिळावी, इतकाच हेतू त्यामागे असतो. दोन ते तीन वर्षांपूर्वी सर्व कंपन्यांकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि त्यांचे दर भिन्न असल्यामुळे एकापेक्षा अधिक सिम कार्डांचा वापर करण्याकडे कल होता. मात्र, सध्या जवळपास सर्वच मोबाइल सेवा पुरवठादारांकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा आणि त्यांचे दर सारखेच असल्यामुळे एकापेक्षा अधिक कंपन्यांचे सिम कार्ड अथवा सेवा घेण्याची आवश्यकता उरलेली नाही. जोशी यांच्या मते अनेक सिम कार्डपेक्षा एकच सिम कार्डचा वापर होणे दूरसंचार उद्योगासाठी चांगली बाब आहे. त्यामुळे कंपन्यांना खऱ्या अर्थाने ग्राहकांचा कल जाणता येणार असून, भविष्यातील डावपेच आणि सेवेचा विस्तार ठरविता येणार आहे.

नियमित रीचार्ज न करणाऱ्या ग्राहकांची सेवा खंडित करणार

नियमित रीचार्ज न करणाऱ्या ग्राहकांची सेवा खंडित करण्याचा निर्णय भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या आघाडीच्या दूरसंचार सेवा पुरवठादारांनी नुकताच घेतला आहे. दोन्ही कंपन्यांनी २८ दिवसांची मुदत असलेल्या ३५ रुपये, ६५ रुपये आणि ९५ रुपयांच्या नव्या योजना सादर केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमांतून दोन्ही कंपन्यांनी रिलायन्स जिओफोन यूजरसाठी सादर करण्यात आलेल्या ४९ रुपयांच्या किमान योजनेला टक्कर देण्याचा चंगच बांधला आहे. त्यामुळे आता ग्राहकांनाही कोणत्या तरी एकाच मोबाइल सेवा पुरवठादाराकडून सेवा घेणे क्रमप्राप्त होणार आहे.

‘रिलायन्स’तर्फे आंतरराष्ट्रीय रोमिंग

रिलायन्स जिओतर्फे ‘व्हीओएलटीई’वर आधारित आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा सादर करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा भारत आणि जपानमध्ये सुरू होणार आहे. ‘व्हीओएलटीई’वर आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा सादर करणारी ‘रिलायन्स जिओ’ ही देशातील पहिलीच कंपनी ठरणार आहे. या रोमिंग सेवेचा फयदा जपानमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. या सुविधेमुळे जपानी पर्यटकांना एचडी दर्जाचा आवाज आणि उच्च वेगाच्या डेटा सेवेचा लाभ मिळणार आहे.