MP च्या काँग्रेस खासदाराच्या हत्येचा आरोपी अद्याप अटक झालेला नाही; सुप्रीम कोर्ट म्हणाले – ‘हे जंगलराज आहे’

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे दमोहचे काँग्रेस नेते देवेंद्र चौरसिया यांच्या हत्येच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला जोरदार फटकारले. या हत्येचा आरोप बीएसपी आमदार रामबाई यांचे पती गोविंद सिंह यांच्यावर आहे. आरोपीला २ वर्षांपासून अटक झाली नाही. इतकेच नाही तर गोविंद यांच्या विरोधात वाॅरंट बजावणाऱ्या कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांना त्रास दिला जात आहे. पोलीस धमकावत असल्याची तक्रार न्यायाधीशांनी केली आहे.

बीएसपीमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या दमोहचे बलवान नेते देवेंद्र चौरसिया यांची हत्या त्यांच्याच क्रशर प्लांटमध्ये केली गेली होती. १५ मार्च २०१९ मध्ये झालेल्या हत्येत चौरसियाच्या कुटुंबीयांनी बीएसपी आमदार रामबाई यांचे पती गोविंद सिंह, दीर चंदू यांच्यासह अजून काही लोकांवर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा मुख्य आरोपी गोविंद सिंह ठाकूर २ वर्षांपासून कोर्टात हजर केला गेला नाही.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये दमोहचे अतिरिक्त स्तर न्यायाधीश आर. पी. सोनकर यांनी आमदारांच्या पतीच्या विरोधात वाॅरंट काढले. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि एम. आर. शाह यांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले. गोविंद सिंह यांना अटक करण्याचे निर्देश त्यांनी राज्याच्या डीजीपीला दिले. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी संपूर्ण घटनेला ‘जंगलराज’ म्हटले आहे.

न्यायमूर्ती शाह म्हणाले की, राज्य सरकारने हे मानले पाहिजे की, ते संविधानानुसार न्याय करू शकत नाहीत. नाराज असलेल्या न्यायाधीशांनी दमोहच्या एसपींना बरखास्त करण्याचे बोलले आहेत, परंतु असा आदेश अजून आला नाही.