IND vs ENG : टीम इंडियात गेल्या 81 एकदिवसीय सामन्यात प्रथमच ‘असं’ घडलं

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना पुण्यात खेळवला जात आहे. 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-1 अशी बरोबरी असल्याने हा सामना मालिका विजयासाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला. फिरकीपटू कुलदीप यादवला डच्चू देत संघात वेगवान गोलंदाज टी.नटराजन याचा समावेश केला आहे. महत्वाची बाब अशी की, भारतीय संघात आजच्या सामन्यात एकही पूर्णवेळ फिरकीपटूचा समावेश नाही. गेल्या 81 एकदिवसीय सामन्यांनंतर पुन्हा एकदा हा प्रकार घडला आहे. यापूर्वी भारतीय संघ 18 जून 2017 साली चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकाही पूर्णवेळ फिरकीपटू शिवाय खेळला होता. त्याही सामन्यात कुलदीप आणि चहल संघाबाहेर होते.

भारत विरुध्द इंग्लंडच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवची कामगिरी निराशाजनक राहिली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात कुलदीपच्या जागी यजुवेंद्र चहल याचा समावेश केला जाईल अशी शक्यता होती. पण भारतीय संघाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत एका फिरकीपटूला बाहेर बसवून वेगवान गोलंदाजाचा समावेश संघात केला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघात कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल दोघही खेळत नाहीत.