भूतानच्या ज्या भूभागावर चीनने केला दावा, तिथेच ‘ड्रॅगन’च्या नाकावर टिच्चून भारत बांधणार रस्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आर्थिकदृष्या विकसित झाल्यानंतर चीनने आपले विस्तारवाद धोरण आक्रमक केले आहे. या धोरणानुसार चीनने सीमावाद असलेल्या शेजारील देशाच्या भूभागावर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या ताब्यात असलेल्या लडाखमधील भूभागावर हक्क सांगत घुसखोरी करण्याचा प्रयत्न चीनने केला. मात्र, भारताने सडेतोड उत्तर दिल्यानंतर चीनने आता भूतानच्या मोठ्या भागावर आपला दावा केला आहे. चीनच्या विस्तारवादाला वेसण घालण्यासाठी भारताकडून तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी भारत ड्रॅगनच्या नकावर टिच्चून चीनने भूतानच्या ज्या भागावर दावा केला आहे त्याच भागातून रस्ता बांधणार आहे. सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणारा हा रस्ता बांधण्याचा भारताने निर्णय घेतला असून चीनच्या सीमेशेजारून हा रस्ता असणार आहे.

या रस्त्यामुळे गुवाहाटी आणि अरुणाचल प्रदेशातील तवांगमधील अंतर 150 किमीने कमी होणार आहे. तसेच या रस्त्यामुळे भारत चीनपेक्षा अधिक वेगाने सीमेवर लष्कर तैनात करू शकेल. उल्लेखनीय बाब म्हणजे केवळ तवांगच नाही तर भूतानचा पूर्व भाग आणि पूर्वोत्तर भारतातील चीनची सीमा लागून असलेल्या भागातही लष्कराला वेगाने हालचाली करता येणार आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला रस्ता बांधणीचं काम दिले आहे. हा रस्ता अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील लुमला परिसराला भूतानमधील त्राशीगांगला जोडेल. त्यामुळे तिबेटमधील थिम्पू शहर भारताच्या टप्प्यात येईल. तसेच दळणवळणाच्या सुविधेसोबतच भारत आणि भूतानची सुविधा वाढणार आहे.