अभिमानास्पद ! कोल्हापुरच्या सौख्या इनामदारनं रचला ‘इतिहास’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – नॅशनल हॉकी लीगच्या सामन्यापूर्वी इंडिया हेरिटेज नाईटचे आयोजन करण्यात आले होते. 18,000 लोकांची क्षमता असेलेल्या सॅन होजेतील सॅप सेंटर स्टेडियममध्ये नॅशनल हॉकी लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय आणि अमेरिकन संस्कृतीचा मेळ दर्शविण्यात आला. यावेळी मुळ भारतीय असलेल्या कोल्हापूरच्या सौख्या इनामदार या तरूणीने साडी परिधान करून अमेरिकेचे राष्ट्रीय गीत गायले. असे गीत गाणारी ती पहिली भारतीय अमेरिकन तरुणी आहे. सौख्याचा जन्म सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये झाला. सध्या ती पर्ड्यू युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे.

तिचे पालक अमित आणि रेणुका इनामदार हे मुळचे कोल्हापूरचे आहेत. 80 च्या दशकात हे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांची कन्या सौख्या हिला भारतीय संस्कृतीचा व देशाचा अभिमान आहे. तिने म्हटले की, हिंदुस्थानी शास्त्रीय संगित शिक्षणाचे पहिले धडे मी आईसोबत गिरवले. माझ्या आई-वडिलांना माझ्यातील सांगीतिक कल आणि क्षमता लक्षात आल्यानंतर त्यांनी मला हे शिक्षण दिले. त्यावेळी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे माझे व्यावसायिक प्रशिक्षण सुरू झाले. 18 वर्ष मी संगीत क्षेत्रात यशाची एक एक पायरी चढत आहे.

नॅशनल हॉकी लीगची टीम सॅन होजे शार्क्स यांनी मिनेसोटा वाईल्डच्या विरुद्धच्या सामन्यात आयएनडी टीव्ही यूएसए समवेत इंडिया हेरिटेज नाईटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौख्याने आपले गायन सादर केले. अठरा हजार प्रेक्षकांची क्षमता असेलेल्या सॅन होजेतील सॅप सेंटर स्टेडियम मध्ये नॅशनल हॉकी लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय आणि अमेरिकन संस्कृतीचे दर्शन सौख्याच्या गायनातून दिसून आला. उपस्थित लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

सौख्या भारतीय साडी परिधान करून अमेरिकेचे राष्ट्रीय गीत गायल्याने स्टेडियम टाळ्यांच्या आवाजाने दणाणून गेले होते. सौख्याने संगीताचे शिक्षण घेतले असून ती एक उत्कृष्ठ गायिका आहे. तिने आजपर्यंत विविध संगीताच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि अनेक बक्षिसे मिळवली आहेत.

सौख्या म्हणते, माझ्या संगीताच्या प्रवासाला गुरू, मार्गदर्शक, कुटुंब आणि मित्रांनी नेहमीच पाठिंबा दिला. टेक्नॉलॉजी हब असलेल्या बे एरीयातमध्ये नोकरी करणे त्याचबरोबर जग भ्रमंती करून आपला संगीत प्रवास निरंतर चालू ठेवणे. अशा भविष्यातील योजना आहेत. व्हिटनी ह्यूस्टन आणि एरिआना ग्रॅंड यांची जोशपूर्ण गाणी मला खूप आवडतात.

सौख्या म्हणाली, लहान मुली जेव्हा म्हणतात की सौख्या तू माझा आदर्श आहेस किंवा मला तुझ्यासारखे गाणे गायचे आहे. तेव्हा खूप समाधान वाटते. भारतीय कलाकारांमध्ये अरिजीत सिंग आणि श्रेया घोषाल यांच्यासोबत गाण्याचे माझे स्वप्न आहे. हे दोघेही संगीतातील माझे प्रेरणास्थान आहेत. चांगल्या घरी जन्म, शिक्षण, व संस्कार मला मिळाले हे मी माझे भाग्य समजते. प्रत्येक मुलाला अन्न, वस्त्र , निवारा व शिक्षण मिळावे तो त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी या कार्यासाठी जमेल तसा सहयोग करेन, असे ती म्हणाली.